मेढा : गुरूपौर्णिमाचे औचित्य साधून जावलीचे तहसिलदार यांनी सपत्नीक येथिल जि.प. प्राथ. शाळेत गुरुजनांचा सत्कार सोहळा संपन्न करुन गुरुपौर्णिमा साजरी केली. मेढा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे हा सोहळा संपन्न झाला. जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ आणि पत्नी रुपाली पोळ यांनी अचानक भेट देवून केलेल्या या कामगिरीने गुरुजनांना आश्चर्याचा धक्का बसला खरा परंतु त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण शिक्षक वर्गच भारावून गेला. तहसिलदार राजेंद्र पोळ आणि रुपाली पोळ यांनी सर्व शिक्षकांना औक्षण करून, पेढा भरवून , योग्य आदरातिथ्य करीत गुलाब पुष्प व पेन अशी भेट दिली. यावेळी तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी आपल्या जीवनातील गुरूचे स्थान किती महत्वाचे आहे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून गुरूजनांचा आदर सत्कार करून त्यांनी दाखविलेला चांगल्या मार्गावर गेल्यावर यश मिळते असे सुचित केले .
यावेळी रुपाली पोळ यांनी मेढा शाळेतील सर्व शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने विद्यार्थी घडवत आहेत असे गौरवोद्गार व्यक्त करून त्यांनी आपला पाल्य नील पोळ इयत्ता सहावीपासून या प्राथमिक शाळेत शिकत असून त्याच्या आतापर्यंतच्या शालेय कारकिर्दीत त्याला मेढा शाळा अतिशय आवडल्याचे नमूद केले आणि शाळेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या गुरुजनांच्या सोहळ्यास मुख्याध्यापक सुरेश शेलार आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांनी उपस्थित राहून सत्कार स्विकारून जावली चे तहसिलदार राजेंद्र पोळ व कुटुबियांनी मेढा शाळेतील शिक्षकांवर दाखविलेला विश्वास सर्वाना प्रेरणादायक आणि काम करण्यास अधिक ऊर्जा देणारा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश शेलार यांनी करताना मेढा केंद्र शाळेचा आलेख सादर करून मेढा शाळा विद्यार्थी घडविणारी आदर्श शाळा असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन योगिता मापारे यांनी करून शाळेबाबतची खास वैशिष्टये सांगितली तर कार्यक्रमाचे आभार शिल्पा फरांदे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
[blockquote content=”जावलीचे तहासिलदार राजेंद्र पोळ सो यांनी क़ुटंबासाहीत अचानकपणे शाळेस भेट देत गुरूजनांविषयी असणारा आदर व्यक्त करून सामाजिक भान राखले असून आहे. त्यांच्या कार्याचा आणि त्यांनी दाखविलेला विश्वास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेढा येथिल सर्व शिक्षक सार्थकी ठरविणार – ” pic=”” name=”-श्री. सुरेश शेलार, मुख्याध्यापक केंद्रशाळा मेढा”]