माणसाचे वेगळेपण समजून मानवी मनाचा वेध घेणारे शास्त्र म्हणजे ‘मानवतावाद’. मागील सदरामध्ये सिग्मंड फ्रॉईडपासून फारकत घेऊन कार्ल रॉजर्स यांनी अस्तित्ववादाच्या अंगाने जाणारे, मानसशास्त्रीय सिद्धांत मांडले व मानवी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये त्याचप्रमाणे व्यक्तीचे अनुभव किती महत्त्वाचे असतात, हे आपण पाहिले. मनाची जडणघडण होत असताना, निरपेक्ष प्रेम अथवा जिव्हाळा मिळणे ही प्रत्येक जीवाची गरज असते आणि ती गरज काही अंशी भागल्यावर, प्रत्येक मानव स्वतःची वाट धुंडाळू शकतो, असा विश्वास रॉजर्स यांनी त्यांच्या सिद्धांताद्वारे मांडला व समुपदेशनात्मक उपचार पद्धतीद्वारे तो सिद्ध करून दाखवला. परंतु कार्ल रॉजर्स यांचा विचार, दृढमूल होत असताना, काही अतिशय महत्त्वाचे मानसशास्त्रज्ञ, विचारक होऊन गेले. ज्यांनी आधुनिक काळातील मानवी मनाचा बहुअंगाने विचार करण्याचा प्रयत्न केला. पाश्चिमात्य देशांमध्ये तेव्हा असलेली युद्धकालीन अथवा युद्धोत्तर परिस्थिती, विखरत चाललेला मानवी समाज, भौतिक सुधारणा आणि विकल झालेली पारंपरिक नितीमूल्य, या सर्वांचा एकूणच मानवी समाज मनावर आणि त्यायोगे व्यक्तीवर खूपच खोलवर परिणाम झाला होता. त्याचवेळेस अमेरिका व काही छोट्या युरोपियन राष्ट्रांमध्ये मानवी मनाच्या कर्तृत्वाला, मानवी वृद्धीला, विकासाला, प्रचंड महत्व येत चालले होते. अर्थात, हा विकास जास्ती करून, भौतिकवादी व काहीसा चंगळवादी विचारांकडे झुकणार होता. या सर्व पार्श्वभूमीवर माणसाचा, ‘माणूस’ म्हणून विचार करणारे, त्याचे मन व मानवी जीवन हे एकूणच कसे वेगळे आहे, याचे पुरते भान असलेले दोन महत्त्वाचे मानवतावादी विचारक म्हणजे ‘अब्राहम मास्लो’ व “एरिक फ्रॉम’.
एकीकडे वर्तनशास्त्राची पार्श्वभूमी ज्यामध्ये, मानव, माकड, कुत्रे, गिनिपिग्स् यांच्यावर होत असलेले सारखेच प्रयोग आणि त्यावर बेतलेले मानवी वर्तनाचे नियम, तर दुसरीकडे फ्रॉईडची व्याधीग्रस्तांवर लक्ष केंद्रित करणारी मनोविश्लेषणात्मक उपचार पद्धती. ज्यामध्ये जास्त करून मानवी मनाच्या अबनॉर्मलिटीला, चुकलेपणालाच जास्त महत्त्व दिले जात होते व त्यावर आधारितच मानवी मनाचा प्रवास कसा घडतो ? मानवी मन कसे आहे ? याविषयीचे सार्वत्रिक ठोकताळे मांडले गेले होते.
एकूणच काय तर, या दोन्ही विचारधारा माणूस इतरांपेक्षा वेगळा आहे, वेगळा असेल तर त्याचे वेगळेपण नेमके कशात सामावलेला आहे ? या प्रश्नांविषयी काहीसे अनभिज्ञ होते. परंतु मास्लो, रॉजर्स, एरिक फ्रॉम आणि पुढे डॉ. व्हिक्टर फ्रँकल या व अशा इतर काही मंडळींनी मानवी मनाच्या वेगळेपणाचा वेध घेण्याचा खूपच प्रामाणिक प्रयत्न, आपल्या सिद्धांतांद्वारे, उपचारपद्धतीद्वारे, तसेच आपल्या स्वतःच्या अनुभवांद्वारे, वेध घेण्याचा प्रयत्न केला. माणसाचे अस्तित्व व त्यांनी लावलेला अस्तित्वाचा अर्थ, या दिशेने मानवी मनाचा शोध, मानवतावादी मानसशास्त्रज्ञ घेताना दिसतात.
अब्राहम मास्लो
अब्राहम मास्लो यांनी माणसाच्या व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये, प्रेरणांना मध्यवर्ती स्थान दिले. त्यांच्या मते, ‘मानवी जीवनाचा नीट अभ्यास करता, आपल्याला असे आढळून येते की, मानवी वर्तन हे अनेक प्रेरणातून उगम पावत असते.’ या प्रेरणांची एक उतरंड अथवा शिडी मास्लो यांनी कल्पिली. जी पुढे Hierarchy of Needs (गरजांचा पदानुक्रम) अशा संबोधनाने प्रसिद्ध झाली. मास्लो यांनी १९५४ साली लिहिलेल्या ‘Motivation and Personality’ या पुस्तकांमध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. या सिद्धांताच्या आधारे, मास्लो यांनी एकूणच मानवी प्रेरणांच्या पायऱ्या, कल्पिल्या आहेत. सर्वात पहिली पायरी म्हणजे ‘शारीरिक गरजा’. ‘भूक’, ‘निद्रा’ व ‘मैथुन’ अशा या गरजा होत. यापुढील पायरी ही ‘सुरक्षिततेची’ असते. प्रथमतः अगदी अस्तित्वाची सुरक्षितता, मग स्थैर्य, नोकरीतील सुरक्षितता, आर्थिक सुरक्षितता, तसेच मानसिक सुरक्षितता ही माणसाची प्रमुख प्रेरणा असते. त्यानंतर येणारी तिसरी पायरी म्हणजे ‘प्रेमाची गरज’. यामध्ये बायको- नवरा, प्रियकर-प्रेयसी, मित्र-मैत्रिणी, धर्माचे, पंथाचे, राष्ट्राचे, वैचारिक प्रवाह, या साऱ्यांचा समावेश असतो. या गरजेला ‘आपलेपणा’ असे नाव मास्लो यांनी दिले आहे. आपण कोणाचे तरी आहोत आणि कोणीतरी आपले आहे, या भावनेतून जे मानवी बंध निर्माण होतात, ते मानवी आयुष्याला, अर्थ देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. थोडसे वेगळे उदाहरण द्यायये झाल्यास, लहानग्या बाळाचेही देता येईल. आईने धपाटा घातलेला, बाळाला चालतो पण तिने दूर लोटलेलं मात्र बाळाला चालत नाही. प्रेमापोटी येणारा राग, द्वेष, इर्षा या सगळ्यांचा समावेश, या प्रेरणेमध्ये असतो. माणसाला, तुटलेपणापासून वाचवणारी प्रेरणा म्हणजे ‘आपलेपणा’. इतर प्राण्यांच्या तुलनेत प्रदिर्घ अशा मानवी जीवनाचे अवलोकन केल्यास आपल्याला जाणवते की, केवळ प्रेम, आपलेपणा हेच मानवी जगण्याला अर्थ, देण्यासाठी कायमच पुरेसे नसतात. प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा, आदर, आपले समाजातील विशिष्ट स्थान, आपल्या वाचून अडणारे व्यवहार, या सर्व गोष्टी फारच महत्त्वाच्या वाटत असतात. त्यामुळेच प्रेरणांच्या अथवा गरजांच्या शिडीवर चौथ्या पायरीवर ‘प्रतिष्ठा’ आणि ‘आदर’ या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. मास्लोने पुढच्या पायरी विषयी बोलताना, अतिशय सुंदर विवेचन केले आहे. त्याचा संपूर्ण मानवतावादी दृष्टिकोन, या पाचव्या पायरीविषयी बोलताना मास्लो यांची मानवी मनाविषयीची जाणिव स्पष्टपणे दिसते. मास्लो यांच्या मते, प्रत्येक मानव हा काहीतरी संचित घेऊन आलेला असतो, अर्थात हे संचित त्याच्यात असलेल्या अनेकविध क्षमतांचे असते. या क्षमता पडताळून पाहणे, स्वतःला आजमावून पाहणे, नवी नवी कौशल्य शिकणे, नवीन नवीन भूमिका, आव्हान, घेऊन पार पाडणे, ही सुद्धा मानवी मनाची एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे. समाजात मिळणारा आदर आणि स्वतःला, स्वतःविषयी वाटणारा आदर, यातील फरक चौथा व पाचव्या पायरीमध्ये आहे. पाचव्या पायरीला मास्लो यांनी ‘आत्मविष्काराची गरज’ असे संबोधले आहे. आपल्यात जी क्षमता आहे, तिची पूर्तता करण्याकडे मानवी मनाची सतत धाव असते, ही धाव म्हणजे ‘स्वतःच्या वास्तविकतेची गरज’, ‘आत्मविष्कार’ अथवा ‘आत्मपूर्तीची’ गरज. मास्लोच्या सिद्धांतानुसार, खूप थोडी लोकं प्रेरणांच्या या पातळीपर्यंत पोहोचतात. त्याचे अतिशय महत्त्वाचे कारण असे की, स्वतःच्या क्षमता आजमावताना तयार होणारी, ‘मनाची अस्थिरता’ सगळ्यांनाच पेलवते असे नाही. स्वतःचा शोध घेणे व त्यातून पलीकडे जाणं, हा सगळाच व्यवहार काहीसा अध्यात्मिक वाटावा असाच असतो. मास्लो यांनी काही महान व्यक्तींची चरित्रे फार काळजीपूर्वक अभ्यासली आणि त्यातून अकरा-बारा जणांची एक यादीच तयार केली. त्यांच्या मते, ही मंडळी प्रेरणांच्या उतरंडीच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचली होती. अब्राहम लिंकन, अल्बर्ट आईन्स्टाईन, विल्यम जेम्स अशी काही मंडळी या यादीमध्ये आपल्याला सापडतात.
एरिक फ्रॉम
‘एरिक फ्रॉम’ हे अतिशय निर्भर बाण्याचे मानवतावादी विचारक होते. त्यांच्या मते, ‘माणसाच्या अस्तित्वाचे दोन प्रकार सतत एकमेकांशी संघर्षाच्या पावित्र्यामध्ये असतात’. त्यातील एक भाग म्हणजे ‘भौतिक वस्तूंच्या, उपभोगाच्या मागे लागणे’ व ‘जगातील सर्व सुखांचा हव्यास धरणे.’ त्याही पुढे जाऊन, त्यावर मालकी हक्क प्रस्थापित करत राहणे. फ्रॉम याला ‘हॅविंग नेचर’ असं नाव देतात, तर माणसातील दुसरा भाग हा व्हिग असा आहे. कुठल्याही गोष्टीपासून खरा आनंद मिळवणे, तो आनंद शेयर करणे, यावर हा भाग अधिक भर देतो. फ्रॉम यांच्या मतानुसार, आज माणूस हव्यास, कवटाळून बसला आहे आणि त्यामुळेच संपूर्ण जग पर्यावरणीय, सामाजिक आणि मानसशास्त्रीय विनाशाच्या टोकावर येऊन उभे राहिले आहे. जोपर्यंत माणसाला याचे पुरसे आकलन होऊन, तो योग्य पर्याय निवडत नाही, तोपर्यंत मानवी जीवनात, मानवी समाजात, मानवी वर्तनात आणि मानवी मनात, कुठल्याही प्रकारचे सकारात्मक बदल संभवत नाहीत. १९७६ मध्ये एरिक फ्रॉम यांनी, ‘To Have Or to Be? The Nature of the Psyche’ या पुस्तकाद्वारे ही संकल्पना जगापुढे आणली. गांधीजींचा विचार या सगळ्याच्याजवळ जाणारा होता. शाश्वत विकास, श्रम प्रतिष्ठा परस्परावलंबित्व, स्वायत्त, लोकशाही (डेमॉक्रॅसी) या सगळ्या मधून गांधीजी सतत शाश्वत विकासाचा पुरस्कार करत आले. ‘थोरो, कार्सन’ यांनीही आणि इतर अनेक लेखकांनी, त्यांच्या लेखनाद्वारे हा विचार पुन्हा पुन्हा मांडला. ‘एरिक फ्रॉम’ यांनी हा विचार मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सैद्धांतिक स्वरूपात जगापुढे आणला.
१९५०-६० च्या दशकामध्ये झालेले अनेक सामाजिक बदल, दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी, त्यातून मानवामध्ये मूळ धरत चाललेली, परात्मतेची तुटलेपणाची जाणीव, अंदा-धुंद व्यक्तिगत चंगळवाद, अति भौतिकतावाद यामुळे होत असलेला नैतिक ऱ्हास या सगळ्याविषयी, एरिक फ्रॉम व इतर अनेक विचारवंतांनी विचार मांडले आहेत. परंतु या सर्वांवर कडी करणारे थोर विचारक व मानसोपचार तज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट म्हणजे ‘डॉ. व्हिक्टर फ्रँकल’. त्यांनी मांडलेली लोगोथेरपी म्हणजे एकाचवेळेस ‘मानवतावादी’ मानसशास्त्राचा कळसाध्यास तर दुसरीकडे नव्याने मूळ धरत असलेला “सकारात्मक मानसशास्त्र” आहे. तो पाया म्हणजे ही ‘डॉ. व्हिक्टर फ्रँकल’ यांची ‘लोगोथेरपी’.
– डॉ. सुचित्रा नाईक