corona
पाली : सुधागडमध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ झाली असून बाधितांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत सुधागडमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होते. परंतु सध्याची बाधितांची वाढती संख्या लक्षवेधी ठरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि.०७ जुलैला १४ रुग्णांची वाढ झाली असून एकूण बाधितांची संख्या ६३ झाली आहे. तर कोरोना बाधितांमध्ये ३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून २७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर या दरम्यान २ कोरोना बाधितांचा मृत्यू देखील झाला आहे.
कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी तालुका प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेत पाली,पेडली,परळी या महत्त्वाच्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडून नये, बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावणे देखील बंधनकारक करण्यात आले होते. पुढे काहीच दिवसांवर गणपती सण येत असून सुधागडमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने नागरिकांना क्वारंटाईन करून बाहेर फिरू न देऊन खबरदारी घेण्याचे आवाहन पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी घेतलेल्या गाव बैठकांमध्ये करण्यात आले आहे.