कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. दोन व्यक्ती भांडत असताना दोघापैकी एखाद्याने जर दुसऱ्याचा प्रायवेट पार्ट दाबला तर त्याला ‘हत्येचा प्रयत्न’ म्हणता येणार नाही. एका खटल्यात निर्णय देताना न्यायालयाने स्पष्ट केलं. दोन व्यक्तींच्या भांडणामध्ये जर एखाद्याने दुसऱ्याचे अंडकोष दाबले, तर ते ते हत्येच्या श्रेणीत नाही येत. यासोबतच न्यायालयाने आरोपीची शिक्षा कमी करत सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा तीन वर्षांवर आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 2010 ची आहे आणि ट्रायल कोर्टाने 2012 मध्ये या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवले होते. 2012 मध्ये दाखल केले अपील हायकोर्टाने या महिन्याच्या सुरुवातीला निकाली काढले होते.२०१० साली याचिकाकर्ता ओंकारप्पा आणि आरोपी परमेश्वरप्पा यांच्यात मोठं भांडण झालं होतं. यावेळी परमेश्वरप्पाने ओंकारप्पाचे अंडकोष दाबले होते. यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात जखम झाली होती. ओंकारप्पाला यानंतर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्याठिकाणी ऑपरेशन करून त्याचे अंडकोष हटवण्यात आले होते. आरोपीने केलेलं कृत्य हे हत्येच्या उद्देशाने केलं नव्हतं, हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने आरोपीची शिक्षा सात वर्षांवरून तीन वर्षं केली.
एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या महत्त्वाच्या अंगाला गंभीर जखम केल्यामुळे, स्थानिक न्यायालयाने परमेश्वरप्पा याला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. यामध्ये त्याने केलेलं कृत्य हे ‘हत्येचा प्रयत्न’ असल्याचं म्हटलं होतं. यानंतर परमेश्वरप्पा याने उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती के. नटराजन यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. ते म्हणाले, की आरोपीने केलेलं कृत्य हे नक्कीच गंभीर आहे. मात्र, तो भांडायला येताना हत्येच्या उद्देशाने आला नव्हता. तसं असतं, तर तो आपल्या सोबत एखादे हत्यार घेऊन आला असता. आरोपीच्या कृत्यामुळे याचिकाकर्त्याचा मृत्यू होण्याची शक्यता होती. मात्र, आरोपीचा तो उद्देश नव्हता.