
कुर्डुवाडी : नगरपालिकेचे कायम चर्चेत असणारे मुख्याधिकारी समीर भूमकर (Sameer Bhoomkar) यांची दीड वर्षाची कुर्डुवाडी येथील कारकीर्द विविध कारणांमुळे गाजली. दीड वर्षानंतर अखेर भूमकर यांची पुणे आयुक्तालयात सहआयुक्त म्हणून बदली झाली आहे.
मुख्याधिकारी म्हणून भूमकर यांचा कालावधी अल्प जरी असला तरी तो त्यांच्या आणि नागरिकांच्या कायम स्मरणात राहील असाच ठरला. दीड वर्षाच्या कालावधीत मुख्याधिकारी म्हणून ते किती काळ नगरपालिकेत हजर होते हा वादातीत प्रश्न आहे. मूळात भुमकर हे कुर्डुवाडीत येण्यास अनुत्सुक होते असे बोलले जात होते. उशीराने का होईना त्यांनी कुर्डुवाडी नगरपालिकेचा पदभार अखेर घेतला. खरा पण सुरुवातीचा काही काळ जाताच येथील नगरपालिकेचा सर्व कारभार कसा हाकला जातो. हे त्यांना ज्ञात झाले. त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीनुसार त्यांनी प्रशासन आणि सत्ताधारी राजकारणी लोकांशी आपले हितसंबंध जपत मुख्यालयात न राहता मुख्यालयाच्या बाहेरुनच आपला कारभार हाकत आपला अधिकसा काळ पूर्ण केला.
अनेक पक्ष संघटनांनी मुख्याधिकारी हे कार्यालयात उपस्थित राहावे यासाठी विविध आंदोलने केली. पण त्यांच्यावर असणारी वरिष्ठांची मेहरनजर यामुळे कोणत्याच आंदोलनाने ते विचलित झाले नाहीत. कोरोनातीलही बराचसा काळ त्यांनी मुख्यालयात उपस्थित न राहता बाहेरुनच हाकला. जरी ते उपस्थित राहिले तर त्याचा सुगावा सुध्दा कुणाला ते लागू देत नसत आणि कर्मचारी ही त्याची वाच्यता कधी करत नव्हते. येथील द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग एकच्या अधिकाऱ्याविना आहे ते काम वाहून नेण्याचे काम करत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीतही येथील काम सुरळीतपणे चालते.
शहरातील पोलिस ठाणे असो, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका इथे सक्षम अधिकारी नसतानाही कुर्डुवाडी शहरातील कारभार अलबेल असल्यासारखा चालतो. ही कुर्डुवाडी शहरवासियांची सहनशीलता म्हणावी की शोकांतिका.