कुर्डुवाडी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कुर्डुवाडी हे रेल्वे जंक्शन (Kurduvadi Railway Junction) असून, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर सर्व सोयीसुविधा याठिकाणी उपलब्ध असल्यामुळे कुर्डुवाडी रेल्वेस्थानक सोलापूर डिव्हिजनमधील सेंट्रल डेपो व्हावा. तसेच रेल्वे कारखान्यात नवीन भरती प्रक्रिया राबवावी व त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी येथील कर्मचारी व नागरिक करत आहेत.
चिंकहिल येथील रेल्वे सुरक्षा बलाचे प्रशिक्षण केंद्र सर्व सोयीसुविधायुक्त असताना ज्याप्रमाणे काही अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर चुकीची माहिती देऊन ते नाशिक येथे स्थलांतरित केले. रेल्वेचे चालू स्थितीतील हायस्कूल हळुहळू करत संपूर्ण बंद केले. त्याचप्रमाणे रेल्वेचे ऑपरेटींग, लोको, रनिंगस्टाफचा डेपो इतरत्र हलविण्याचा घाट काही अधिकाऱ्यांमार्फत घातला जात असल्याची भीती कर्मचारीवर्गात तसेच नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. भविष्यात जर हा डेपो इतरत्र स्थलांतरित केला. तर याचा विपरीत परिणाम शहराच्या विकासावर देखील होणार आहे.
रेल्वे हीच मुळात कुर्डुवाडी शहराची ओळख आहे. रेल्वेमुळेच शहराला वैभव प्राप्त झाले असून रेल्वे ही शहराची आर्थिक नाडी आहे. कुर्डुवाडी शहर व परिसरात रेल्वेची मुबलक अशी जमीन आहे. ज्याठिकाणी एखादा नवीन प्रकल्प सुद्धा उभारता येऊ शकेल. तसेच शहरात रेल्वेचे हाॅस्पिटल आहे. रेल्वे क्वाॅर्टर्स आहेत. पाण्याची सोय आहे. शिवाय उच्च शिक्षणाकरीता मुलांना मोठ्या शहरात जावयाचे झाल्यास हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे चारी दिशेला जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांना हा सोयीस्कर असा सेंटर प्लेस असून ऑपरेटींग, लोको, रनिंगस्टाफ हा डेपो देखील याठिकाणी सेंट्रल डेपो होऊ शकतो. याठिकाणी या कर्मचाऱ्यांना राहण्याची सोय देखील उत्तम होऊ शकते. शिवाय सर्वात महत्वाची बाब म्हणजे रेल्वेच्या पैशाची बचत देखील होणार आहे. याठिकाणी मोठ्या शहराप्रमाणे एचआरए किंवा सिटी अलाउन्स सुद्धा द्यावा लागणार नाही.