आजवर पंचाक्षरी नाटके ही मराठी रंगभूमीवर तुफान गाजली आहेत. अर्थात हा ज्याच्या-त्याच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा प्रश्न जरी असला तरीही बरेच निर्माते आजही नाटकाचे बारसे करताना ‘पंचाक्षरी’चा आग्रह धरतात, पण एक नाटक असं आहे की ज्या नाटकाने मराठी रंगभूमीला अभिनयाचे वैभव असलेल्या ‘पंचतारका’ दिल्या आहेत. अशा तारका की ज्यांनी आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर रसिकांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य केलय. याच जानेवारी महिन्यात या नाटकाचा वाढदिवस देखिल आहे. जो चक्क ४९ वा आहे. तरीही हे नाटक आणि त्यातील मध्यवर्ती भूमिका उर्फ ‘टायटल रोल’ हा रसिकराजा विसरलेला नाही.
– नाटक अर्थातच पु. ल. देशपांडे यांचे ती फुलराणी! ज्यातील ‘फुलराणी’च्या भूमिका जिवंत केल्या त्या तारका म्हणजे- भक्ती बर्वे, प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी (मोने), अमृता सुभाष आणि हेमांगी कवी! यातीत भक्ती आणि प्रिया या दोघीजणी आज आपल्यात नाहीत; पण त्यांची ‘फुलराणी’ एका पिढीच्या दर्दी रसिकांच्या निश्चितच स्मरणात आहे. या ‘फुलराण्या’ रंगमंचावर कायम ‘हाऊसफुल्ल’ गर्दी खेचणाऱ्या ठरल्यात. त्यामुळे अनेक निर्मात्यांना आजही असे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी विचार करतात. या नाटकाचा ठसा हा खोलवर नाट्यसृष्टीत उमटला आहे. जो कायम अभ्यासकांनाही खुणावतो.
पहिली फुलराणी भक्ती बर्वे ! ‘तुला शिकवीन चांगलास धडा!’ हा संवाद जणू त्यावेळी परवलीचा झाला होता. आजही ‘फुलराणी’तले संवाद, स्वगते ही एकपात्री अभिनय स्पर्धेत हमखास सादर होतात. आजोबांनी बघितलेल्या नाटकातील स्वगते आज नात सादर करतेय. येवढी जबरदस्त शब्दांची ताकद त्यातल्या संवादात गच्च भरलेली. ‘कसदार अभिनय आणि अप्रतिम शब्दफेक’ याचा अनुभव या नाटकाच्या जुन्या चित्रीकरणातून बघायला मिळतात. त्या थक्क करुन सोडणाऱ्या. भक्ती बर्वे हिचा प्रवास दूरदर्शनवरल्या वृत्तनिवेदिका म्हणून सुरू झाला जो सक्षम अभिनेत्रीपर्यंत पोहचला. तिचं प्रत्येक नाटक गाजलं. अखेरचा सवाल, टिळक आणि आगरकर, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी, आई रिटायर होतेय, घरकुल, अजब न्याय वर्तुळाचा – ही नाटके वैशिष्टपूर्ण भूमिकांमूळे नंबर वन ठरली पण त्यांच्या ‘फुलराणी’ला तोड नाही. बालरंगभूमीवर भूमिका करुन त्यांनी रंगमंच ही विद्यार्थी दशेतच बघितला होता. सुधाताई करमरकर यांच्या ‘लिटील थिएटर’मध्ये त्यांनी अनेक बालनाट्यात हजेरीही लावली होती. शफी इनामदार याच्यासोबत तिचा प्रेमविवाहही झाला. शफी वारल्यानंतर पाचएक वर्षानी एका अपघातात भक्ती गेती. २००१ हे साल. वाई येथून येताना त्या गेल्या. सळसळत्या उर्जेची फुलराणी काळाआड गेली. मुलाखत घेण्याचा योग आला होता तेव्हा त्या म्हणाल्या ‘चित्रपट, दूरदर्शन यापेक्षा माझं प्रेम हे मराठी रंगभूमीवर आहे. नाटक वाचलं तर मराठी माणूस कायम आनंदी राहील. ही जिवंत कला जगावी म्हणून शाळेपासून प्रयत्न करावयास हवेत !
अगदी संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारापासून अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. काही हिंदी चित्रपटही त्यांनी केले पण खरी ओळख त्यांना ‘फुलराणी’ने दिली. ज्यात त्यांनी अभिनयाचं सर्वस्व ओतलं होतं. ‘भक्ती बर्वे म्हणजे फुलराणी’ हे समीकरणच बनलय. भक्तीने केलेली भूमिका पूढे चौघीजणींनी रंगभूमीवर पेश केली. प्रत्येकीचे रंग ढंग आगळेवेगळे. प्रत्येक प्रयोगात त्यांना नवनव्या जागा या मिळत गेल्या आणि ‘फुलराणी’ परिपूर्ण बनली. ‘नटसम्राट’प्रमाणे ‘फुलराणी’ची भूमिका आयुष्यात एकदा तरी साकार करायला मिळावी, हे स्वप्न प्रत्येक अभिनेत्रीचं असतं…
दुसरी फुलराणी-प्रिया तेंडुलकर. विजय तेंडुलकर यांची कन्या जरी असली तरीही तिनं स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली. तो काळ दूरदर्शनचा. एक नवं करमणुकीचं माध्यम जोरात होतं. ८०-९०ते दशक. साऱ्यांचं लक्ष घराघरात पोहचलेल्या दूरदर्शनच्या कार्यक्रमावर असायचं. एका पंचतारांकित हॉटेलात प्रिया नोकरीला होती. नाटकासाठी नोकरी सोडली. ललितलेखन सोबत सुरु होतेच. काही निवडक नाटके तिने केली. त्यात – गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी – ही नाटके. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’मध्ये केलेली भूमिका गाजली. दूरदर्शन मालिकांच्या इतिहासात पहिली टिव्ही स्टार म्हणून ‘रजनी’ गाजली. ‘प्रिया तेंडुलकर शो’ सुध्दा वेगळ्या वाटेचा ठरला. ‘हम पॉंच’ ही हिंदी मालिका आणि गोंधळात गोंधळ चित्रपट आठवणीत आहे. पुलंच्या शब्दांना शंभरटक्के न्याय देणारी ‘फुलराणी’ रसिकांपुढे आली. वयाच्या फक्त ४२ व्या वर्षी त्या काळाआड गेल्या. ‘रजनी’ आणि ‘फुलराणी’ या दोन्ही भूमिकांचे मुखवटे अप्रतिमच!
तिसरी फुलराणी म्हणजे सुकन्या कुलकर्णी. नंतर मोने झाली. नाट्यसृष्टीतलं एक गोड दाम्पत्य. नुकत्याच झालेल्या शताब्दी नाट्यसंमेलनात दोघांची उपस्थिती होती. सुकन्या यांचा रंगभूमीवरला दमदार शुभारंभ हा ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकापासून झाला. हाती असलेल्या भूमिकेवर अभ्यास करण्याची त्यांची शिस्त. प्रा. वामन केंद्रे यांच्या ‘झुलवा’मध्येही त्या होत्या. वेगळ्या वळणावरलं वैशिष्टपूर्ण नाटक ‘फुलराणी’तल्या भूमिकेसाठी विचारणा होताच नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. स्वतःला अभिनेत्री म्हणून सिद्ध करण्याची संधी म्हणून ‘फुलराणी’ त्यांनी फुलविली. भूमिका लक्षवेधी ठरली.
चौथी फुलराणी होती अमृता सुभाष. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ यातून नाट्यविषयक अभ्यास पूर्ण केलेली ही गुणी अभिनेत्री. आजही रंगभूमीवर सक्रीय आहे. त्यांचे पती संदेश कुलकर्णी लिखित- दिग्दर्शित ‘पुनश्य हनिमून’ या नाटकात हे दाम्पत्य भूमिका करताहेत. तरुण जोडप्यांनी बघण्याजोगं नाटक असून अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहे. हे नाटक दोनदा ‘परीक्षक’ म्हणून बघण्याचा योग आला. अमृताची ‘फुलराणी’ काही वर्षापूर्वी चर्चेत होती. त्यांची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष या आहेत. आईकडून अभिनयाचा वारसा त्यांच्याकडे चालत आलेला. २००४ साली मराठी ‘श्वास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जो जगभरात गाजला. त्यातील त्यांची भूमिका अप्रतिमच होती. अभिनय, लेखन, गायन, संगीत असा चौफेर प्रवास केलेल्या या ‘फुलराणी’ने नाटक, चित्रपट, मालिका यातून रसिकांचे लक्ष वेधले आहे. ‘पुन्हा फुलराणी करणार का?’ हा प्रश्न जर तिला कुणी विचारला तर निश्चितच. क्षणाचाही विलंब न करता ‘अमृता’ एका क्षणात होकार देईल!
पाचवी ‘फुलराणी’ म्हणजे हेमांगी कवी! मूळची साताऱ्याची असली तरी ‘बोल्ड अँड ब्युटीफूल’ म्हणून चंदेरी रुपेरी दुनियेत ओळखली जाते. मालिकांमध्ये आणि मॉडेलींगमध्ये कायम चर्चेत असते. २०१६च्या सुमारास हेमांगीने ‘फुलराणी’चा मुखवटा चढविला. नव्या पिढीचे दिग्दर्शक राजेश देशपांडे याच्या दिग्दर्शनाखाली नव्या दमात प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ झाले. फुलराणीसोबत प्राध्यापकांच्या भूमिकेत डॉ. गिरीश ओक होते. तर धनंजय चाळके यांनी निर्माते म्हणून ‘फुलराणी’ रंगभूमीवर पून्हा आणली. आघाडीचे नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य केल होते. संहितेत कुठेही जराही बदल न करता केवळ तांत्रिक बाजूत थोडे बदल होते. हेमांगीला ‘फुलराणी’च्या रुपात बघण्याची संधी मिळाली आणि त्यापूर्वीच्या फुलराण्यांच्या आठवणींनाही उजाळा मिळाला. या पंचतारकांनी भूमिकचे अक्षरशः सोने केले.
– संजय डहाळे