सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी सातारा शहरालगतच्या प्रतापसिंह नगरला नुकतीच भेट दिली. शिंदे यांनी नगराचा संपूर्ण परिसर पिंजून काढत येथील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. आमदार महेश शिंदे यांनी वेगवेगळ्या कामांच्या आणि दौऱ्यांच्या निमित्ताने कोरेगाव मतदारसंघाचा कोपरा अन् कोपरा पिंजून काढला आहे.
सातारा आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीवरील व कोरेगाव विधानसभा कार्यक्षेत्रातील प्रतापसिंह नगर भागाला यापूर्वी दोनवेळा भेट दिली. मात्र, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यंदाची त्यांची भेट लक्षणीय ठरली. महेश शिंदे यांनी प्रतापसिंह नगराचा संपूर्ण दौरा पायी करून येथील नागरिकांशी संवाद साधला रस्ते, वीज, पक्की घरे या विविध प्रश्नांची अडचणी नागरिकांनी आमदार शिंदे यांच्यासमोर मांडली. या समस्येची नोंद महेश शिंदे यांनी घेत या समस्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले. प्रतापसिंह नगरामध्ये पक्क्या रस्त्यांची तत्काळ कामे करून दिली जातील, असे आमदार शिंदे यांनी सांगितले. नागरिकांशी संवाद आणि तब्बल दीड तास पायपीट यामुळे आमदारांचा हा दौरा लक्षवेधी ठरला.
यावेळी आमदार शिंदे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. येथील युवा संघटक गणेश पालके, अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सामाजिक कार्यकर्ते विजय गाढवे, माजी सरपंच भीमराव लोखंडे, माजी सरपंच आप्पा माने, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव, सुधीर काकडे, स्वप्नील लोखंडे, स्वप्नील बोराटे, रोहित माने, अझहर इनामदार, अरविंद ओव्हाळ, सुभाष अडागळे यावेळी उपस्थित होते.