
मुंबई : मुंबईकरांनो पुढील आठवड्यात पाणी जपून वापरा, कारण पुढील आठवड्याच्या मंगळवारी म्हणजे २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाणीकपात होणार आहे. भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष पंपिंग स्टेशनच्या बाराशे मिमी व्यासाच्या जलवाहिनीच्या दोन झडपा बदलण्याचे तसेच पिसे-पांजरपूर संकुल येथील तिसऱ्या टप्प्याच्या पंपिंग स्टेशनच्या एका बिघडलेल्या पंपाची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामांमुळे मुंबईतील निवडक भागांमध्ये १५ टक्के पाणीकपात केली जाईल. काम मंगळवारी सकाळी १० ते रात्री १० या कालावधीत पूर्ण केले जाईल. त्यामुळं मुंबईकरांनो सोमवारीचा पाण्याचा स्टॉक भरुन ठेवा असं आवाहन पालिकेनं केलं आहे.
बुधवारी विलेपार्ले-जोगेश्वरी पूर्व, भांडुप, कांजूर, विक्रोळी, धारावी भागात पाणीकपात
मंगळवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पवई येथे १८०० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व आणि तानसा पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे कामही हाती घेण्यात येईल. हे काम बुधवारी सकाळी १० पर्यंत पूर्ण होईल. या कामामुळे मंगळवार २६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत विलेपार्ले-जोगेश्वरी पूर्व, भांडुप, कांजूर, विक्रोळी, धारावी तसेच वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या भागांमध्ये १०० टक्के पाणीकपात केली जाईल. त्यामुळं नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं सांगण्यात आलंय.
दरम्यान या वर्षी पाऊस समाधानकारक पडला आहे, तसेच परतीच्या पावसाने सुद्धा जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळं तलावात, धरणामध्ये पाण्याचा साठा बऱ्यापैक आहे. मुंबईत ज्या भागांमध्ये पाणीकपात आहे त्या भागांतील नागरिकांनी आवश्यक तेवढ्या पाण्याचा साठा करुन ठेवावा. पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने केले आहे.