सातारा : राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार व शरद पवार, अजित पवार यांचे विश्वासू असणारे शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच जिल्हा बँकेसाठी खिंडीत पकडले आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांचे विश्वासू सहकारी ज्ञानदेव रांजणे हे आहेत. येत्या दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेऊन असे सूचक वक्तव्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कराड येथे केले होते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक काही तासांवर आली असून अजूनही जावळी सोसायटी मतदारसंघात नाट्यमय घडामोडींचा सिलसिला आज दिवसभर सुरू आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार आज आंबेघर येथे विधानपरिषदचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील यांच्यासह आज सोसायटी मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध आव्हान निर्माण केलेल्या ज्ञानदेव रांजणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन रांजणे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रांजणे यांच्यासोबत २८ मतदार असून, या निवडणुकीत रांजणे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केला आहे. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाटेत अडथळे निर्माण झाले आहेत.
जावळी सोसायटी मतदारसंघात आमदार शिंदे व रांजणे यांच्यातील राजकीय तेढ भविष्यात राष्ट्रवादीला अडचणीची ठरणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या शिष्टाईला सुध्दा रांजणे यांच्या बंडखोर गटाने अव्हेरल्याने जावली तालुक्याचे राजकारण वेगळ्याच वळणावर येऊन पोहचल्याने सातारा जिल्हयाच्या राजकारणात शरद पवारांचा शब्द अंतिम असतो ही राजकीय परंपरा या प्रकरणाने खंडित झाली आहे. मात्र, भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली जावलीच्या राजकारणावरील पकड मजबूत करत एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत.