pruthviraj chavhan
कराड : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 7 जुलैपासून सुरू होत आहे. काँग्रेसचे वर्तमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. आगामी पावसाळी अधिवेशनात हे पद भरण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यात 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता. परंतु, विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अध्यक्षपदासाठी त्यांनी नकार दिला होता. गेल्या 4 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिंडोरीचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष असलेले नरहरी झिरवाळ हे हंगामी विधानसभा अध्यक्ष आहेत.
आता पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण प्रबळ दावेदार मानले जात आहे. तर भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे नावही चर्चेत आहे.