सांगली : थोर महापुरूष, महनिय व्यक्ती यांचे पुतळे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाने नियमावली ठरविली आहे. तसेच पुतळा बसविण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सन 2017 पासून स्थानिक जिल्हा प्रशासनास दिलेले आहेत.
पुतळे स्थापन करताना राष्ट्र पुरूषांचा योग्य सन्मान राखला जावा यासाठी पुतळा समितीने न्यायालय व शासनाने दिलेल्या मागदर्शक नियमांची व विविध परवानग्यांची पूर्तता करावी. जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यासाठी पुतळा समितीने सर्व परवानग्यांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जत प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, पोलीस उपअधिक्षक अशोक वीरकर, तहसिलदार जीवन बनसोडे, व पुतळा समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी पुतळा समितीने न्यायालय व राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून सर्व प्रकारच्या परवानग्या मिळविण्यासाठी सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा. सदरच्या परवानग्या मिळविण्यासाठी पुतळा समितीस सर्वोतोपरी सहकार्य प्रशासनामार्फत करण्यात येईल. समिती मार्फत आलेल्या परिपूर्ण प्रस्तावास जिल्हा प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद राहील, असे त्यांनी सांगितले.
तसेच जिल्हाधिकारी डॉ. चौधरी पुढे म्हणाले, जतमधील जनतेचा व लोकभावनेचा आदर करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा लवकरात लवकर बसविण्यासाठी पुतळा समितीने आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळविण्यासाठी गतीने काम करावे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी लोकप्रतिनिधी व स्थानिक जनतेने प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे. तसेच स्थानिक प्रशासनानेही दक्ष रहावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यावेळी म्हणाले, छत्रपती शिवजी महाराज यांचा पुतळा चबुतऱ्यावर लवकरात लवकर बसावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्यात येईल. तथापी, कायद्याचा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी स्थानिक पदाधिकारी व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.