अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची तिसरी घटना आज अहमदनगरमध्ये उघडकीस आली. नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाणे आवारातील शौचालयात गळफास घेत एसटी कर्मचाऱ्याने आपली जीवनयात्रा संपविली. आज बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
ज्ञानेश्वर निवृत्ती मराठे (वय ६२) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते सेवानिवृत्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याजवळ सापडलेल्या बस तिकिटावरून १६ ऑक्टोबरला ते नगरला आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याजवळ बॅग सापडली असून त्यात वापराचे कपडे व असलेल्या वाहन परवान्यावरून त्यांची ओळख पटली. त्यांच्याकडे बसचे तिकिटही आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांनी आत्महत्येसाठी पोलीस ठाण्याचा आवारच का निवडला? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
लुंगीच्या साहाय्याने गळफास
कोतवाली पोलीस ठाण्यात नेहमीच तक्ररदारांची गर्दी असते. त्या आवारात असलेले शौचालय फारसे वापरात नाही. आज सकाळी सफाई कर्मचारी सफाईसाठी गेला असता त्यांना लुंगीच्या सहाय्याने गळफास घेतलेला मृतदेह दिसला. घटनेची माहिती कळताच डीवायएसपी अजित पाटील, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी तिकडे धाव घेतली. बॅगेतील लायसन्सवरून त्यांची ओळख पटली. मृतदेहाचा वास सुटला होता. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीचा हा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आहे.