
shaukeen automatic paan dispensing machine in Pune nrvk
पुणे : रात्री जेवण उरकून बाहेर पडायला उशीर झाला तर काय करायचे, कोठे आणि कसे पान मिळवायचे, हा प्रश्न आता कायमचा मिटला आहे. कारण पुण्यातील शौकीन मंडळींना चोवीस तास पान मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ‘शौकीन, द कम्प्लिट पान शॉप’च्या नळस्टॉप येथील दुकानाबाहेर ‘ऑटोमॅटिक पान डिस्पेन्सिंग मशीन’ बसविले असून, त्या मार्फत दिवसा किंवा रात्री कधीही शौकिनांना पान मिळणार आहे.
‘शौकीन’चे मालक शरद मोरे यांच्या संकल्पनेतून हे मशीन बसविण्यात आले असून, हे भारतातील नव्हे, तर जगातील पहिले ‘ऑटोमॅटिक पान डिस्पेन्सिंग मशीन’ ठरले आहे. पान वितरित करणाऱ्या या स्वयंचलित यंत्रणेचे उद्घाटन दुकानाचे मालक श्री. शरद मोरे यांच्या मातोश्री लक्ष्मी मोरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. या वेळी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका सौ. मधुरीताई सहस्रबुद्धे आणि सौ. मंजुश्री खर्डेकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
वेगळे काय करू शकतो, हा विचार मनात आला आणि त्यातून मग वेगवेगळ्या कल्पना सुचल्या. त्यापैकी पहिले काम केले ते म्हणजे वातानुकुलित दुकानात पान विक्री करण्याचे. नंतर अनेक प्रकारची पाने तयार करू लागलो. नंतर मिठाई विकणाऱ्या काही व्यावसायिकांनी दुकानांमध्ये अशा पद्धतीने माल विक्रीसाठी ‘ऑटोमॅटिक डिस्पेन्सिंग मशीन’ लावल्याचे पाहिले. तेव्हा आपण पानासाठी अशी यंत्रणा का विकसित करू शकत नाही, हा विचार मनात आला आणि त्यातून ही स्वयंचलित यंत्रणा विकसित केली, ’ अशी माहिती ‘शौकीन’चे मालक शरद मोरे यांनी दिली.
‘आता ही यंत्रणा नेमकी कशी आहे आणि त्याला प्रतिसाद कसा मिळतो, हे पाहण्याच्या दृष्टीकोनातून नळस्टॉप येथील दुकानामध्ये हे मशीन बसविण्यात आले आहे. भविष्यात पुण्यातील आणि मुंबईतील निवडक प्रतिष्ठित हॉटेल आणि रेस्तराँच्या परिसरात हे ‘ऑटोमॅटिक पान डिस्पेन्सिंग मशीन’ बसविण्यात येणार आहे, ’ अशी माहितीही मोरे यांनी दिली.
‘ऑटोमॅटिक पान डिस्पेन्सिंग मशीन’शी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल ‘कनेक्ट’ करावा लागेल. त्यानंतर आपल्या मोबाईलवर उपलब्ध पानांची यादी आणि दर दिसतील. त्यानंतर आपल्याला जी पाने पाहिजेत, ती पाने सिलेक्ट करावी लागतील. मोबाईलच्या मार्फतच पेमेंट करावे लागेल. एकदा का आपल्या पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या मशीनमधून आपण निवडलेल्या पानांचा बॉक्स एका ‘ट्रे’मध्ये येईल आणि नंतर त्या ‘ट्रे’मधील पानांचा बॉक्स बाहेर येईल आणि मग आपण त्या पानांचा आस्वाद घेऊ शकाल.
मशीनमध्ये कोणत्या प्रकारची किती पाने उपलब्ध आहेत आणि किती पानांची विक्री झाली, याचे आकडे ‘शौकीन’च्या कर्मचाऱ्यांकडील मोबाईलवर उपलब्ध असतील. त्यानुसार त्या मशीनमध्ये कोणत्या प्रकारच्या पानांचे किती बॉक्स कधी ठेवायचे, याचा निर्णय घेतला जाईल. ‘व्हेंडेकिन’ कंपनीने हे मशीन तयार केले आहे.
पान वितरित करणाऱ्या स्वयंचलित यंत्रणेतून मसाला, मघई, चॉकलैट तसेच ड्रायफ्रूट आणि आठ वेगवेगळ्या स्वादाची स्पेशल चॉकलेट मघई पाने मिळणार आहेत. फुलचंद किंवा तंबाखूजन्य पाने मात्र, या स्वयंचलित यंत्रणेतून मिळू शकणार नाहीत.