मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातील कोरोना स्थिती तसेच लसीकरण आणि लावण्यात आलेले निर्बध वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती माहितगार सूत्रांनी दिली आहे. राज्यात १८ वयापेक्षा जास्त वयाच्या नागरीकांचे लसीकरण सध्या थांबविण्यात आल्याच्या मुद्यावर या बैठकीत साकल्याने चर्चा झाली असून लसी उपलब्ध होतील त्या प्रमाणे ही मोहिम पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती या सूत्रांनी दिली.
जूनच्या मध्यात लसीकरणाला वेग
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिरमच्या लसीची उपलब्धता येत्या दहा दिवसांत होण्याची शक्यता नसल्याने भारत बोयोटेककडून कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा मे आणि जूनमध्ये दुप्पट होणार आहे. जुलै आणि आँगस्टमध्ये लसींचे उत्पादन अनेकपटीने वाढणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सप्टेबरपर्यंत महिन्याला भारत बायोटेक १० कोटी डोसेस प्रति महिना तय़ार करणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून मिळाल्याचे सांगण्यात आले.
रशियाची स्पुतनिक मिळणे दुरापास्त
रशियाची स्पुतनिक लस महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता कमी असल्याचेही या चर्चेत समोर आले आहे असे या सूत्रांनी सांगितले. स्पुतनिक लस मिळण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नाला अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नाही. मात्र स्पुतनिक लससाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असल्याचे आरोग्य विभागाकडून या वेळी सांगण्यात आल्याची माहिती या सूत्रांनी दिली आहे.
बुरशीजन्य आजार आणि प्राणवायूवर लक्ष
राज्यात रेमडेसीवीर सह अन्य औषध उपाय योजनाबाबतही या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यात बुरशीजन्य रोगाच्या प्रसाराला आळा घालण्याच्या उपायांसोबतच लहान मुलांमधील कोविड-१९ चा प्रसार थांबविण्याबाबत करायच्या उपाय योजनांवर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले.
राज्यात प्राणवायूच्या उपलब्धतेसाठी करण्यात येणा-या प्रयत्नांचा आढावा या वेळी घेण्यात आला येत्या किमान वीस दिवसांत राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक प्राणवायूची अतिरिक्त व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले