तर कठोर कारवाई करण्यात येईल, पोलीस महासंचालकांनी दिला इशारा

आत्तापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी 15 हजार लोकांवर कारवाई केली आहे. 149 ची नोटीस 13 हजार लोकांना नोटीस देण्यात आली आहेत. तसेच पोलीसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कुणीही अनुचित प्रकार केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
rajnish seth
Published on: 
Updated on: 

मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद येथील सभा त्यांच्यासाठी अडचण निर्माण करू शकते. राज ठाकरे यांच्या सभेतील भाषणाचा अभ्यास करण्यात येत असून त्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद सीपी सक्षम आहे आणि ते कारवाई करतील. औरंगाबाद पोलिस आयुक्त गुन्हे कोणते लावायचे आणि कारवाई काय करायची याचा अभ्यास करीत आहे. कोणीही जातीय तेढ निर्माण केला तर आम्ही त्यावर कडक कारवाई करू. अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरून लाउडस्पीकर काढण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी प्रसंगी कठोर पावले उचला असे स्पष्ट आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. त्यानंतर पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी मीडियाशी संवाद साधला.

गृहमंत्र्यांनी आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police)सक्षम आहेत. त्याचबरोबर समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई केली जाणार आहे. प्रक्षोभक भाषण करणं, वैयक्तिक टिका करणं, समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं असल्यास, सभेसंबधी पोलिसांनी दिलेल्या निर्देशांच उल्लंघन झालं असल्यास कारवाई होऊ शकते असंही सांगण्यात आलं आहे. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या असून एसआरपीएफ (SRPF) आणि होमगार्ड (homeguard) राज्यात तैनात करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवल्यास कारवाई करण्यात येईल. राज्यातील जनतेला आवाहन आहे की त्यांनी शांतता व सुव्यवस्था राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावं असेही ते म्हणाले.

CRPF च्या 87 कंपन्या, 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात

"कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेतल्यास कारवाई केली जाईल. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू नका, असं आवाहन पोलीस महासंचालकांनी केलं. ते पुढे म्हणाले की,"कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज आहे. सीआरपीएफच्या 87 कंपनी आणि 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर आहेत."

मनसेच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीस

राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपण तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटीस पाठवल्या आहेत.

आत्तापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी 15 हजार लोकांवर कारवाई केली आहे. 149 ची नोटीस 13 हजार लोकांना नोटीस देण्यात आली आहेत. तसेच पोलीसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कुणीही अनुचित प्रकार केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. राज ठाकरेंना नोटीशीबाबत औरंगाबाद पोलिस आयुक्तांना माहिती आहे. आजचं कारवाई होणार, त्याबाबत औरंगाबाद पोलिस आयुक्त निर्णय घेतील.