
पॉर्न सिनेमे तयार करून अॅपवर विक्री केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली, आणि सिने जगतातील या अधोजगताची चर्चा पुन्हा सुरु झाली. इंटरनेटमुळे पॉर्नोग्राफिक साईटसची संख्या वाढली. पॉर्न कंटेन्ट आपल्या तळहातावर मोबाईलमुळे उपलब्ध झाला, हे सत्य असले तरीही अद्ययावत तंत्रज्ञान नसतानाही अश्र्लिल साहित्य, व्हिडीओ, सीडी यांचाही बाजार गरम होताच. आज पॉर्न व्हिडीओचा विचार केला तर सर्वाधिक पॉर्न पाहणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो.
नैतिकता विरुद्ध अनैतिकता, ढोंग विरुद्ध इच्छा आणि वास्तविकता विरुद्ध सूक्ष्म सत्य या सगळ्यांची सरमिसळ, याबाबतचा संभ्रम पहावयास मिळतो तो पॉर्न इंडस्ट्रीबाबत. ही सगळी मुल्ये व्यक्तिनिष्ठ किंवा व्यक्तीपरत्वे बदलणारी आहेत. म्हणजे जे एखाद्याला अनैतिक वाटत असेल ते दुसऱ्याला अपरिहार्य म्हणूनच नैतिकच वाटू शकतं. नैतिक – अनैतिकाची सीमारेषा फार धूसर आहे. आणि त्यामुळेच पॉर्नची घृणा करणारे किंवा त्यास अनैतिक मानणारे आणि थेट खुलेपणाने पॉर्न इंडस्ट्रीची पाठराखण करणारे असे गट दिसू लागले आहेत.
राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक. त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या, आणि पॉर्न इंडस्ट्री हा विषय पुन्हा चर्चेत आला. मुंबईच्या झगमगाटात भविष्य शोधण्यासाठी येणाऱ्या तरुण – तरुणींना चित्रपटात काम देण्याच्या नावावर आणायचे, त्यांच्याशी करार करायचा आणि त्यांच्याकडून पॉर्न व्हिडीओमध्ये काम करून घ्यायचे. हे व्हिडीओ परदेशातून मोबाईत अॅपवर अपलोड करायचे. या सगळ्या चित्रीकरणासाठी मुंबईतील मढ भागात २० ते २५ हजार रुपये दरदिवस असा करार करून बंगला भाड्याने घ्यायचा. त्या बंगल्यात चित्रीकरण करायचे. एकदा या सगळ्यात अडकल्यानंतर तरुणींना धमकवायचे, अशी कुंद्रा आणि टोळीची मोडस ऑपरेंडी असल्याचा दावा पोलिस करतात. कुंद्राने या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केल्याचे पुरावेच समोर आले आहेत.
पॉर्नचा व्यवसाय
जगातील अनेक देशांत पॉर्न फिल्म्सवर पूर्णपणे बंदी आहे. तरीही जगातील ३३० कोटी लोक पॉर्न पाहतात, आणि त्यातील ३० टक्के महिला आहेत, हे उघड सत्य आहे. अमेरिका आणि युरोपातील काही देशांमध्ये पॉर्न इंडस्ट्रीला कायदेशीर मान्यता आहे. या ठिकाणी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अमेरिका, युरोपच्या पाठोपाठ भारतात पॉर्न बघणाऱ्यांची संख्या आहे. पॉर्न पाहणाऱ्यांच्या सर्वाधिक संख्या असलेल्या देशांमध्ये पाकिस्तानातही पहिल्या पाचात आहे. जगभरातील पॉर्नचा व्यवसाय ९८ अब्ज रुपयांपेक्षाही अधिक असल्याचा दावा केला जातो.
इंटरनेट सहज, सुलभरित्या उपलब्ध झाल्यामुळे पॉर्नचा व्यवसाय फोफावला आहे. पॉर्न फिल्म तयार करणारे आणि विविध अॅपच्या माध्यमातून ती लोकापर्यंत पोहचणारे एक जाळे तयार आहे. सोशल मिडीयावर किंवा पॉर्न सर्च करणाऱ्यांच्या पुढ्यात एखाद्या पॉर्न चित्रपटाचे टीझर टाकून त्यांना अशा संकेतस्थळांकडे आकर्षित करण्यात येते. हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आणि नियोजनबद्ध पद्धतीने केला जातोय.
हे वय धोक्याचं
पॉर्न चित्रपटांना ज्या देशांमध्ये कायदेशीर ठरवले आहे, त्या देशांमध्येही असे चित्रपट पाहण्यासाठी १८ वर्षे ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अमेरिकेत पॉर्न बघणाऱ्यांचे सरासरी वय ३९ वर्ष आहे. मात्र भारतात हेच सरासरी वय २८ वर्षे आहे. भारतातील १८ ते २४ वयोगटातील ४४ टक्के, २५ ते ३४ वयोगटातील ४१ टक्के पॉर्न साईटस बघतात. या वयात पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये अनेक लैंगिक विकृती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगाच्या तुलनेत पॉर्न बघणाऱ्यांचे भारतीयांचे सरासरी वय धोकादायक आहे.
आतबट्ट्याचा व्यवसाय
भारतात कायदेशीर मान्यता नसल्यामुळे पॉर्न इंडस्ट्रीचे काम सर्वसामान्यांपासून चोरुन – लपून सुरु असते. या इंडस्ट्रीशी संबंधित सगळ्यांसाठी किंवा पोलिसांसाठी हा व्यवसाय शरीर विक्रय करणाऱ्यांच्या माहितीप्रमाणेच उघड गुपित असते. सचिन वाझे असताना एक तरुणी या सगळ्या प्रकरणाबाबत तक्रार करते. पण वाझे गजाआड गेल्यानंतर पोलिस तपास सुरु करतात आणि कुंद्रा अडकतो. पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या चौकशीत कुंद्रापर्यंत पोहचण्यास इतका उशीर का लागला, याचे उत्तर कदाचित मिळणारही नाही. पण कुंद्राप्रमाणेच प्रतिष्ठीतांच्या बुरख्याआड वावरणाऱ्यांचे खरे रुप समोर येईल. सिने जगतातील काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी आजवर एखादा फ्लॉप चित्रपट केला आहे. किंवा एकही चित्रपट केलेला नाही, त्या अभिनेत्रींचे उच्चभ्रू राहणीमानसुद्धा आता संशयाच्या फेऱ्यात येईल.
अंडरवलर्डचा पैसा?
पॉर्न इंडस्ट्रीमध्ये राज कुंद्रा याने मोठी गुंतवणूक केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहेत. पण या इंडस्ट्रीमध्ये गुन्हेगारी जगताचाही पैसा लागला आहे का, याचा शोध लागणे आवश्यक आहे. अनेक सिने निर्मात्यांच्या प्रकल्पांमध्ये गुन्हेगारी जगतातील पैसा ओतण्यात आल्याची कुजबुज सुरु असते. त्याच प्रमाणे पूर्णपणे अवैध असलेल्या पॉर्न इंडस्ट्रीच्या कारभारात हा पैसा नसेल, याची खात्री कोणी देऊ शकणार नाही. त्यादृष्टीने राज कुंद्रा आणि गुन्हेगारी जगताची मिलीभगतही शोधण्याची गरज आहे.
दुटप्पी भूमिका
पॉर्नबाबत अनेकदा समाजाची भूमिकासुद्धा दुटप्पी असल्याचे दिसते. एकीकडे नैतिकतेची, संस्कारांची, परंपरांची ग्वाही देणाऱ्या समाजातच पॉर्न स्टार सनी लिओनी स्वीकारली जाते. नुसतीच स्वीकारली जात नाही, तर तिच्या संपत्तीचे, जीवनशैलीचे कोण आकर्षण तरुण – तरुणींमध्ये असते. आमच्या वेळी असं नव्हतं, असं म्हणून नाकं मुरडणाऱ्यांच्या काळातही सविता भाभी, हैदोस असं पिवळं साहित्य त्याकाळातही होतं. या साहित्याचे चोरुन – लपून वाचन आणि विक्रीही जोमात होती. आज इंटरनेटवर सहज उपलब्ध होणारे पॉर्न व्हिडीओ ही त्याचीच सुधारित आवृत्ती आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
मनुष्य स्वभाव हा स्खलनशील आहे. त्यामुळे अशी अनेक आकर्षणे आजुबाजुला असताना त्यापासून दूर राहणे त्याला कठीण् होते. नेमक्या याच मानसिकतेचा लाभ् घेणारे अनेक राज कुंद्रा विविध आकर्षणांचा व्यापार करत असतात. त्यातच ऑनलाईन शिक्षणाने तरुण – तरुणींचा स्क्रीन टाईम वाढवला आहे. पालकांना त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे आपापल्या सदसदविवेक बुद्धीने या आकर्षणांपासून दूर राहणे हेच या पिढीच्या हाती आहे.
महेश राजे
चीफ रिपोर्टर, मुंबई