Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिनेमाचा प्रवास… आशा, स्वप्न ते वास्तव गोष्टी

आपल्या देशात सिनेमा रुजवला तो प्रामुख्याने आशावादी, स्वप्नाळू, कष्टकरी वर्गाने आणि आज तो अनेक वळणे घेत घेत पुढे चालला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हापासून ते आजपर्यंतच्या चौफेर वाटचालीवर फोकस टाकताना ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. आणि या प्रवासात सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक, विनोदी, रहस्यमय, प्रेम, देशभक्ती, पौराणिक असे अनेक प्रकारचे चित्रपट निर्माण झाले.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Aug 15, 2021 | 05:00 AM
सिनेमाचा प्रवास… आशा, स्वप्न ते वास्तव गोष्टी
Follow Us
Close
Follow Us:

स्वातंत्र्य प्राप्त झाले त्याच काळात हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद यांचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले आणि या त्रिमूर्तीचा चित्रपट रसिकांवर विलक्षण प्रभाव पडला. तो आजही कायम आहे हे विशेषच आहे. या तिघांवर, स्वतःपेक्षा जास्त प्रेम करण्यात त्यांच्या चाहत्यांना विलक्षण आनंद वाटे.  जोडीला अतिशय श्रवणीय गीत-संगीत व नृत्य यांची केमिस्ट्री होती. तेव्हाच्या अनेक चित्रपटात एकाच वेळेस तब्बल दहा बारा गाणी असत आणि ती सर्वच्या सर्व लोकप्रिय ठरत. विशेष म्हणजे, तेव्हा शहरी जीवनातही रेडिओ फारसा रुजला नव्हता. घरी ग्रामोफोन असणे प्रतिष्ठेचे होते. इराणी हॉटेलमध्ये ज्यूक बॉक्समध्ये  पाच  पैशांचे नाणे टाकून आवडते गाणे ऐकायला मिळे. अशी मर्यादित माध्यमे असूनही गाणी लोकप्रिय ठरली होती. हिट गाण्यांमुळे एका पिढीतील हा चित्रपट अनेक पिढ्या ओलांडूनही हिट असतात हे आपल्या चित्रपट संस्कृतीचे विशेष होय.  अंदाज (जुना), श्री ४२०, जिस देश मे गंगा बहती है, आवारा, अलबेला, फागून, गुंज उठी शहनाई,  अनारकली, बैजू बावरा, मुगल ए आझम, बसंत बहार, दो आंखे बारह हाथ, झनक झनक पायल बाजे, नवरंग  असे अनेक चित्रपट त्या काळात बहारदार गीत संगीताने लोकप्रिय झाले. आणि ही गाणी पडद्यावर पाहण्यासाठी अनेक रसिकांनी पुन्हा पुन्हा या चित्रपटांना गर्दी केली.

हा एकूणच प्रवास सुरु असताना गुरुदत्तने आपल्या दिग्दर्शनातील कागज के फूल, प्यासा या चित्रपटाना कलात्मक लूक दिला आणि हिंदी चित्रपटाचे आणखी एक पाऊल पुढे पडले. कागज के फूल तर आपल्याकडचा पहिला सिनेमास्कोप चित्रपट. तर राज कपूर दिग्दर्शित संगम हा आपल्याकडचा पहिला दोन मध्यंतरचा चित्रपट होय.

त्या काळात चित्रपट प्रामुख्याने दिग्दर्शकामुळे ओळखला जात असे. त्यात काही नावे आवर्जून घ्यायला. चित्रपती व्ही शांताराम, मेहबूब खान, के. असिफ, राज कपूर, चेतन आनंद, अमिया चक्रवर्ती, विजय आनंद, बिमल रॉय, कमाल अमरोही, राज खोसला, ह्रषिकेश मुखर्जी  यांचा उल्लेख हवाच.

याच मुख्य प्रवाहासह एकीकडे मा. भगवानदादांचे अलबेला वगैरे मनोरंजन चित्रपट रसिकांना आवडत असत तर दुसरीकडे दारासिंगच्या स्टंटपटाचाही एक प्रवाह होता. फौलाद, तुफान, आया तुफान, रुस्त मे हिंद, लुटेरा, डंका वगैरे वगैरे अनेक चित्रपट दारासिंगच्या अॅक्शनने रंगले. एकाच वेळेस अनेक प्रवाहातून वाटचाल करणे ही आपल्या चित्रपट संस्कृतीची खासियत आहे.

साठच्या दशकापर्यंत हिंदी चित्रपट प्रामुख्याने ब्लॅक अॅण्ड व्हाईट अर्थात कृष्ण धवल स्वरुपात होता. अगदी राजेश खन्नाची भूमिका असलेले ‘बहारो के सपने ‘, ‘आखरी खत ‘ हे चित्रपट ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहेत. तर याच दशकाच्या उत्तरार्धात मनोजकुमारने ‘उपकार’ या देशभक्तीवरील चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करुन प्रेक्षकांमधील देशभक्तीची भावना जागी केली आणि मग  पूरब और पश्चिम, शोर, रोटी कपडा और मकान, क्रांती असे देशभक्तीवरचे चित्रपट रुपेरी पडद्यावर आणताना स्वतःचा हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण केला.

पण सिनेमा म्हणजे एक दिशा मार्ग नव्हे. त्याची एकाच वेळेस विविध स्तरांवर वाटचाल सुरु असते. अगदी सुरुवातीला अशोककुमारसारखे स्टार बॉम्बे टॉकीज या निर्मिती संस्थेत मासिक पगारावर होते आणि त्या बॅनरखालील किस्मत, झूला वगैरे वगैरे अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारलीय. कालांतराने शाहरुख खान, सलमान खान एकेका चित्रपटासाठी किती कोटी मानधन घेतात याची जरा जास्तच चर्चा रंगली. फार पूर्वी चित्रपटाच्या गुणवत्तेवर ‘फोकस’ पडू लागला. कालांतराने अमूकतमूक चित्रपट किती कोटीत निर्माण झाला आणि त्याने

पहिल्या तीन दिवसांत किती कोटीची कमाई केली यांच्या ब्रेकिंग न्यूज होऊ लागल्या. हा सगळा आकड्यांचा खेळ किती खरा नि किती प्रसिद्धीचा याचा कधीच शोध घेतला जात नाही.

सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटात अनेक प्रवाह निर्माण झाले आणि ती एक नवीन वाटचाल ठरली. त्यातून असे झाले की, अनेक चित्रपट रसिकांनी तोपर्यंतच्याच चित्रपटावर प्रेम करण्याची भावना कायम ठेवली.

या दशकाच्या पूर्वार्धात राजेश खन्नाच्या सुपर स्टार क्रेझने सामाजिक सांस्कृतिक आणि माध्यम क्षेत्रात सकारात्मक उर्जा निर्माण केली. तर अशातच अमिताभ बच्चन नावाचे अॅग्री यंग मॅन प्रतिमेचे वादळ निर्माण झाले. यातच रमेश सिप्पी दिग्दर्शित सर्वकालीन सुपर हिट “शोले ” ( १९७५) ने मल्टी स्टार कास्ट चित्रपटाचे आणि सूडकथा असे दोन प्रवाह निर्माण केले. चित्रपटाचा अभ्यास करताना “शोले” पूर्वीचा आणि नंतरचा हिंदी चित्रपट अशीच विभागणी होऊ लागली. आणि ती योग्य मानली जाते.

या सगळ्यात आणखीन दोन प्रवाह निर्माण झाले होते. एक म्हणजे नवप्रवाहातील चित्रपट अर्थात कलात्मक अथवा समांतर चित्रपट आणि दुसरा म्हणजे धाडसी थीमवरील चित्रपट. पहिल्या प्रकारचे चित्रपट रुजवण्याचे श्रेय मृणाल सेन दिग्दर्शित ‘भुवन शोम ‘ ( १९७०) या चित्रपटाला जाते तर दुसरीकडे बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘चेतना ‘ ( १९७२) ने एकाद्या बंगल्याच धाडसी कथानकावरचा चित्रपट निर्माण करण्याचे युग आणले. हे दोन्ही प्रवाह वाटचाल करु लागले. त्यातच बासू चटर्जी दिग्दर्शित ‘छोटी सी बात ‘( १९७५) ने क्वालिटी चित्रपट असा एक ट्रेण्ड रुजवला. सतराम रोहरा निर्मित ‘जय संतोषी मा’ ( १९७५) च्या खणखणीत यशाने पौराणिक चित्रपटाला मुख्य प्रवाहात स्थान मिळाले. त्या दशकातील तो सुपर हिट दहा चित्रपटांपैकी एक ठरला.

सत्तरच्या दशकात अशी चहूदिशांनी हिंदी चित्रपटसृष्टीची घौडदौड सुरु राहिली. रौप्यमहोत्सवी हिट, सुवर्ण महोत्सवी हिट यांची खूपच मोठी पर्वणी रुळली.

ऐंशीच्या दशकात मात्र हीच परिस्थिती आश्चर्यकारकरित्या पालटली. आपल्या देशात १९८२ साली रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला आणि चित्रपटगृहाला पर्याय निर्माण झाला. तोपर्यंत दूरदर्शन येऊन दहा वर्षे झाली होती तरी त्याची चित्रपटाला तितकीशी स्पर्धा निर्माण झाली नव्हती. पण आजच प्रदर्शित झालेल्या नवीन चित्रपटाची आजच व्हिडिओ कॅसेट उपलब्ध होऊ लागली आणि चित्रपटगृहाला जोरदार स्पर्धा निर्माण झाली. शहरातून व्हीडीओ कॅसेट लायब्ररीजचे अफाट पीक आले तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ थिएटर निर्माण झाली.

यामुळे थिएटरमधील गर्दीला  ओहोटी लागली म्हणून आणि मनोरंजन करात कपात करावी या मागणीसाठी महाराष्ट्रात १० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर १९८६ असा एक महिना  चित्रपटसृष्टी बंदचे आंदोलन झाले.

नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला उपग्रह वाहिन्याचे आगमन झाले आणि काही वर्षांतच ते वाढले. आता चित्रपटगृहाच्या वाटचालीबाबत मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अशातच राजश्री प्रोडक्शनच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन ‘ ( १९९४) आणि यशराज फिल्मच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे ‘ ( १९९५) या चित्रपटांच्या खणखणीत यशाने परिस्थितीत सकारात्मक फरक पडला. या चित्रपटानी देशात तर झालेच पण अगदी जगभरातील अनेक देशांत उत्तम यश संपादले आणि व्यावहारिकदृष्ट्या हिंदी चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट सिस्टीम दिली. एव्हाना आपल्या देशात जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था यांचे आगमन झाले होते आणि त्याचा आता हिंदी चित्रपटावर परिमाण दिसू लागले होते. हिंदी चित्रपटसृष्टीला आता ‘बॉलीवूड ‘ म्हटले जाऊ लागले ते ‘हॉलीवूड ‘च्या धर्तीवर होते तरी अशी नक्कल ती का करायची? आता एकिकडे हम आपके है कौनपासून मोठ्या शहरात तिकीट दरात कमालीची वाढ होताना हिंदी चित्रपट आता जनसामान्यांचे मनोरंजनाचे हुकमी साधन न राहता ते आता शहरी नवश्रीमंत, उच्चभ्रू वर्गाचे मनोरंजन होऊ लागले. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर चकाचक आकर्षक हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्याचा ट्रेण्ड सुरु झाला. आता चित्रपटाचा नायक अनिवासी भारतीय असल्याचे प्रमाण वाढले. यातच रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सत्या ‘ ( १९९७) मध्यममार्गी वास्तववादी चित्रपटांचा ट्रेण्ड आणला. तसे होणे गरजेचे होते.

नवीन शतकाच्या एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच २००१ साली आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान ‘, अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर एक प्रेमकथा ‘ आणि फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है ‘ हे नवीन पिढीचे चित्रपट आले. लगान आणि गदर एक प्रेमकथा देशभक्तीची भावना जागी करणारे तर दिल चाहता है मैत्रीची नवीन व्याख्या सांगणारा चित्रपट आला. या तीनही चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळाल्याने अशा पठडीतील चित्रपटांच्या निर्मितीला वाव मिळाला. ‘लगान ‘ची भारताची ऑस्करसाठीची प्रवेशिका म्हणून निवड झाली आणि एक पुढचे पाऊल पडले. तोपर्यंत आपल्या देशातून दरवर्षी ऑस्करसाठी चित्रपट पाठवला जाई. पण ‘लगान ‘ने विदेशी चित्रपट विभागात नामांकन प्राप्त केले आणि हिंदी चित्रपट नवीन युगानुसार कात टाकतोय हे अधोरेखित केले. यातच शहरात मल्टीप्लेक्स संस्कृती आली. ती पाश्च्यात्य जगातून येथे आली हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच.  एकाच ठिकाणी चार पाच अथवा सात छोट्या छोट्या स्क्रीनची थिएटर आली. त्यासह सकाळी नऊ वाजता ते मिडनाईट मॅटीनी शो असे दिवसभर सिनेमा शोचे  युग आले. त्यासह तिकीट दरही चढे राहिले आणि पॉपकॉर्न, कार पार्किंग यांना महत्व आले.

जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा ऐतिहासिक भव्य चित्रपटांचे युग आले. त्याचवेळी न्यूटन, मुल्क, टॉयलेट एक प्रेमकथा अशा वेगवेगळ्या थीमवरील चित्रपटांचे युग आले. नवीन पिढीतील पटकथा लेखक आणि दिग्दर्शक जगभरातील चित्रपट पाहतात, त्यापासून प्रभावित होतात यामुळेही हिंदी चित्रपट कात टाकण्यात यशस्वी ठरला आहे.

हे सगळे सुरु असतानाच काही वर्षांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट रिलीज होऊ लागले. सुरुवातीला त्याचे अस्तित्व फक्त हायफाय सोसायटीतील डिजिटल पिढीत होते. कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून देशभरातील चित्रपटगृहे बंद ठेवावी लागली आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे अस्तित्व अधोरेखित होत राहिले. अमिताभ बच्चनची भूमिका असलेला ‘गुलाबो सिताबो ‘ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होताना तो इंग्रजी, फ्रेन्च, स्पॅनिश वगैरे वगैरे एकूण पंधरा भाषेतील सबटायटलने शंभरपेक्षा जास्त देशात पोहचला आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचे अस्तित्व वाढले. त्यानंतर लक्ष्मी, राधे, मिमी इत्यादी अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले. आणि भविष्यात अनेक मध्यम आणि छोट्या बजेटचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत राहतील.

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला तर ओटीटीवर आपल्याकडच्या मराठी व हिंदी चित्रपटासह दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटांचे सबटायटलने अधिकाधिक चित्रपट पाह्यची संधी आहे आणि मग ते सरावाचे झाले. असे काही बदल होतच असतात. हे होताना चित्रपटातील हुकमी गाणी बाजूला पडलीत आणि नवीन गाण्यांना जन्म देण्याऐवजी जुन्या गाण्यांचे रिमिक्स अवतार येताहेत. हे एक प्रकारचे सांस्कृतिक पतन आहे.

पंचाहत्तर वर्षापूर्वीचा सिनेमा आणि तेव्हाची सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे यांची संस्कृती आणि आजच्या गतीमान स्पर्धेच्या युगातील ओटीटी प्लॅटफॉर्मने जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण केला ( सत्तरच्या दशकात देशात साडेबारा हजार असलेल्या सिंगल स्क्रीनची संख्या आता साडेसहा हजारावर आली आहे)  असा हा खूपच मोठा प्रवास सुरु आहे आणि यापुढेही तो अनेक प्रकारच्या अडचणींवर मात करत, नवीन आव्हाने पेलत, अगणित  वळणावरून पुढे सुरु राहणार आहे. आपल्या देशातील चित्रपटाचे वेड समाजातील सर्वच वर्गात रुजले आहे आणि ते इतके घट्ट आणि खोलवर आहे की चित्रपट पाहण्याची माध्यमे बदलली आणि वाढली तरी सिनेमाचे वेड कायमच राहणार आहे. या एकूणच प्रवासात सिनेमासमोर मालिका, रिअॅलिटी शो, गेम शो, वेबसिरिज अशा अनेक गोष्टींची स्पर्धा निर्माण झाली, तरीही चित्रपट टिकून आहे हेच पंचाहत्तराव्या स्वातंत्र्य दिनी आवर्जून सांगायला हवे.

– दिलीप ठाकूर 

Web Title: The journey of indian cinema hope dream to reality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2021 | 05:00 AM

Topics:  

  • Independence Day Special

संबंधित बातम्या

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
1

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा
2

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा

Independence Day: ‘समर्पण, शौर्य अन् बलिदान’! भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाच्या ठरल्या ‘या’ घटना
3

Independence Day: ‘समर्पण, शौर्य अन् बलिदान’! भारतमातेच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाच्या ठरल्या ‘या’ घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.