कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) सेंटर ऑफ एक्सलन्स इन सेरिकल्चर या केंद्राचे कार्य शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिशादर्शक स्वरुपाचे आहे, असे मत महाराष्ट्राच्या रेशीम संचालनालयाचे प्रादेशिक संचालक महेंद्र ढवळे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील रेशीमशेती, गडहिंग्लज येथील अंडीपुंज निर्मिती केंद्र आणि शिवाजी विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्स इन सेरिकल्चर आदी विविध उपक्रमांची पाहणी आणि शेतकऱ्यांच्या गाठीभेटी व चर्चा यासाठी ढवळे दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा भेटीवर आले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत सदिच्छा भेटीने या दौऱ्याचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य
ढवळे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या रेशीमविषयक केंद्राने शेतकऱ्यांना शैक्षणिक व प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले आहे. अगदी कोविड-१९च्या कालखंडातही शेतीशाळेसारखा साप्ताहिक उपक्रम ऑनलाईन राबवून देशभरातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे योग्य प्रकारे उदबाेधन व प्रबोधन करण्याचे महत्त्वाचे कार्य या केंद्राने आणि केंद्राचे संचालक डॉ. ए.डी. जाधव यांनी केले आहे.
मलबेरी रोप देऊन स्वागत
कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते मलबेरी रोप देऊन ढवळे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. ए.डी. जाधव, जिल्हा रेशीम अधिकारी भगवान खंडागळे आणि गडहिंग्लज रेशीम कार्यालयाचे अनिल संकपाळ आदी उपस्थित होते.