मराठी चित्रपट असो, नाटक असो, वा मालिका नेहमीच फ्रेश दिसणारा उमेश कामत आता एक्सापयरी डेट नसलेली फ्रेश लव्हस्टोरी घेऊन आला आहे. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत उमेशच्या जोडीला मुक्ता बर्वे आहे. १२ जुलैपासून सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या या मालिकेच्या निमित्तानं उमेशनं ‘नवराष्ट्र’शी एक्सक्लुझीव्ह बातचित केली.
आठ वर्षांपूर्वी ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेत दिसलेला उमेश कामत ‘अजूनही बरसात आहे’च्या निमित्तानं छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. याबद्दल तो म्हणाला की, आठ वर्षांपूर्वी ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ ही मालिका केली होती. बरोबर जून २०१३ मध्ये ती मालिका संपली होती. आता या जूनमध्ये ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. प्रचंड एक्साइटमेंट आहे. जेव्हा ही मालिका करायची ठरवली, तेव्हा उत्सुकता होतीच, पण पहिल्या प्रोमोला मिळालेला रिस्पाँस पाहिल्यावर एक्साइटमेंट आणखी वाढली आहे. यासोबतच जबाबदारीही वाढली आहे. प्रोमोद्वारे थेट विषयाला हात घालणं मला खूप आवडलं आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, पूर्वी काही वर्षांपूर्वी या मालिकेचा नायक-नायिका एकत्र आले होते, पण नंतर काही कारणांमुळं एकमेकांपासून दूर गेले. काही कालावधीनंतर ते पुन्हा एकमेकांसमोर आलेत. माझ्या मते यात प्रेमाचं एक वेगळं स्वरूप पहायला मिळेल. काहींना वाटतं की प्रेम एकदाच होतं. काहींना वाटतं अनेकदा होऊ शकतं. या मालिकेतील लव्हस्टोरी खूप वेगळी आहे. कॅालेजच्या काळापासून मिडलएजपर्यंत मालिकेतील लव्हस्टोरी आलेली आहे. तिथपर्यंतचा प्रवास आणि पुढची गोष्ट सांगणारी ही लव्हस्टोरी आहे.
पुन्हा एकदा लव्हस्टोरी करण्याबाबत उमेश म्हणाला की, मला नेहमीच लव्हस्टोरी करायला आवडते. या मालिकेला ‘प्रेमाला एक्सपायरी डेट नसते’ ही टॅगलाईन देण्यात आली आहे, जी मालिकेत काय पहायला मिळणार हे सांगणारी आहे. प्रत्येक वयातील लव्हस्टोरी ही खूप महत्त्वाची असते. कॅालेजमधल्या लव्हस्टोरीची जास्त चर्चा होत असते, पण एखादं वयोवृद्ध जोडपं पाहिल्यावर त्यांची लव्हस्टोरी किती छान असेल अशी भावना आपल्या मनात निर्माण होते. प्रत्येक वयातील वेगवेगळी लव्हस्टोरी असते. लव्हस्टोरी माणसाला नवचैतन्य देते. समोर एखादी लव्हस्टोरी पाहत असतानाही आपल्या चेहऱ्यावर छान स्माईल येते. आयुष्यात फ्रेशनेस येतो. ही मालिका सर्वांच्या घरी हाच फ्रेशनेस घेऊन येणार आहे. आतापर्यंत लॅाकडाऊनमुळं लोकांना स्ट्रेस आला असेल, पण या मालिकेद्वारे घराघरात आम्ही प्रेम वाटणार आहोत. प्रत्येक वयातील व्यक्तीला सध्या प्रेमाची गरज आहे. ही मालिका प्रत्येकाच्या चेहऱ्यावर छानशी स्माईल आणून आजूबाजूचा स्ट्रेस विसरायला लावेल. घरोघरी प्रेम जागृत करेल. आज ही काळाची गरज आहे. प्रेमात जी शक्ती आहे ती कशातही नाही. या मालिकेमुळं प्रत्येकाच्या आयुष्यात फ्रेशनेस येईल.
मालिकेत प्रथमच मुक्तासोबत
मुक्ताची मुख्य भूमिका असलेल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत मी एक कॅमिओ केला होता, तेव्हा मुक्ता आणि मी एकमेकांसमोर आलो होतो. तो कॅमिओ असल्यानं एक-दीड महिनाच काम केलं होतं. फुल फ्लेज एकमेकांसमोर असणारी ही मुक्तासोबतची माझी पहिलीच मालिका आहे. यापूर्वी ‘लग्न पहावं करून’ या चित्रपटात आम्ही एकत्र काम केलं आहे. मुक्ता अत्यंत फोकस आणि सिनसीअर आर्टिस्ट आहे. अशा प्रकारची सहकलाकार मिळाल्यावर आपलंही काम उठून येतं. लहान सहान गोष्टींमध्ये छान मजा करता आली पाहिजे. काम करून घरी परतताना काहीतरी चांगलं केल्याचं समाधान असायला पाहिजे. कारण डेली सोप ही मोठी कमिटमेंट असते.
पस्तीशीतील लव्हस्टोरीची गंमत
आजवर मी बऱ्याच लव्हस्टोरीज केल्या, पण या लव्हस्टोरीत एक वेगळी गंमत आहे. आतापर्यंत कॅालेजवयीन लव्हस्टोरीमध्ये काम केलं आहे, तरुण वयातील जास्त प्रेमकथा केल्या आहेत, पण पस्तीशीतील लव्हस्टोरी प्रथमच करतोय. यातसुद्धा दोन रुपांमध्ये आम्ही दिसणार आहोत. फ्लॅशबॅकमधलं कथानक समोर येईल, तेव्हा आम्ही एकदम यंग दिसणार आहोत. वर्तमान काळात पस्तीशीतील दिसू. ही तारेवरची कसरत आम्ही दोघे कसे काय करणार आहोत हे ठाऊक नाही, पण आता ही कसरत करावीच लागणार आहे. ती करतानाही मजा येणार आहे. लव्हस्टोरी ही लव्हस्टोरीच असते. प्रत्येक वयातील लव्हस्टोरी वेगळी असते. अगदी १८ वर्षे वयापासून नव्वदीतीलही लव्हस्टोरी असते. त्याच पद्धतीनं ही म्हटली तर वेगळी लव्हस्टोरी आहे. यातील इमोशन्स आणि प्रेम तसंच इन्टेन्स असणार आहे. पस्तीशीतील दिसण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. अभिनयातून ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. पस्तीस आणि कॅालेजमधील दोन्ही रुपं दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
डॅाक्टरच्या रूपात प्रथमच प्रेक्षकांसमोर
‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत मी साकारत असलेल्या कॅरेक्टरचं नाव आदिराज आहे. हा व्यवसायानं डॅाक्टर असून, गायनॅाकॅालॅाजीस्ट आहे. त्याची एक छान फॅमिली आहे. फक्त त्याची फॅमिली काहीशी वेगळ्या पद्धतीची आहे. त्याचे वडीलही डॅाक्टर आहेत. आई, मोठी बहिण, तिचा नवरा आणि त्यांचा मुलगा असं त्याचं कुटुंब आहे. ही पुण्यातील गोष्ट आहे. या मालिकेत मी खरं तर पुण्यात नव्हतो. दहा वर्षांनंतर पुण्यात परतलो असल्याचं दाखवण्यात येणार आहे. आतापर्यंत इतकीच गोष्ट सांगता येईल. बाकीचं मालिकेत पहायला मिळेलच. मेडीकल कॅालेजपासूनची आम्हा दोघांची लव्हस्टोरी टप्प्याटप्प्यानं उलगडत जाणार आहे. प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या ‘ताठ कणा’ या चित्रपटात डॅा. पी. एस. रामाणींची भूमिका साकारली आहे, पण मालिकेमध्ये प्रथमच डॅाक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ताठ कणा’ अद्याप रिलीज व्हायचा असल्यानं डॅाक्टरच्या रूपात मी प्रथमच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
यासाठी स्वीकारली ‘अजूनही बरसात आहे’
मध्यंतरीच्या काळात मला मालिकेसाठी बऱ्याचदा विचारणा होत होती, पण मी नकार द्यायचो. कोणताही प्रोजेक्ट निवडताना दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर हा करायला हवा असा आतून आवाज आला पाहिजे किंवा आपण काय करतोय, कोणा बरोबर काम करतोय याचा व्यवस्थित विचार केलेला असायला हवा. मालिकेच्या बाबतीत मी बऱ्यापैकी चूझी आहे. ही मालिका स्वीकारण्यामागं तीन प्रमुख कारणं आहेत. पहिलं कारण मुक्तासोबत काम करायला मिळणं. दुसरं कारण आयरीश प्रोडक्शन हाऊसची मालिका असणं आणि तिसरं म्हणजे सोनी मराठीचा प्रेमळ आग्रह. सोनी मराठीनं गोष्ट सांगितल्यावर मला ती खूप इंटरेस्टींग वाटली. ज्या पद्धतीनं सोनी या मालिकेकडं पहात आहे, मेहनत घेत आहे, लिखाणापासून सर्व बाजू ज्या प्रकारे सांभाळल्या जात आहेत ते पाहता हा प्रोजेक्ट इंटरेस्टींग होणार याची खात्री आहे.