पाथर्डी : शहरातील पाथर्डी मोहटादेवी रस्त्यावर असणाऱ्या निवासी मूकबधिर शाळेच्या बाहेर साधारण एका आठवड्याचे जन्मलेले स्त्री जातीचे जिवंत बेवारस अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील फिरायला गेलेले अजित आव्हाड यांना हे अर्भक सोमवारी पहाटेच्या सुमारास आढळून आले.
सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास शहरातील रहिवासी अजित आव्हाड हे मोहटादेवी रोडवर फिरायला गेले असता त्यांना मूकबधिर विद्यालयाच्या बाहेर एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला. यावेळी त्यांनी जवळ जावून पाहिले असता या ठिकाणी साधारण सात-आठ दिवसांचे स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले. यावेळी त्यांनी विद्यालयातील कर्मचारी दत्तात्रय बढे यांना याची माहिती देऊन सदरील अर्भक उचलून विद्यालयाच्या ऑफिसमध्ये ठेवले.
यानंतर ही माहिती पाथर्डी पोलिसांना दिल्यानंतर नवजात अर्भकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या अर्भकाला पोलीस ठाण्यात ठेवले. यावेळी ठाण्यातील महिला पोलिसांनी बालकाला दूध पाजून योग्य संगोपन केले.
पोलीस नाईक संदीप कानडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्यानंतर नवजात अर्भकाला स्नेहालय या संस्थेकडे देण्यात येणार होते.