कराड : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (Satara District Bank Election) उद्या (दि. 21) मतदान होत आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, प्रशासन सज्ज झाले आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड, पाटण या दोन सोसायटी मतदारसंघात राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर जावळी, माण, खटाव व कोेरेगावच्या लढतीकडे लक्ष लागून रहिले आहे. या निवडणुकीत 1 हजार 964 मतदार आपल्या मताचा अधिकार बजावरणार आहेत.
राष्ट्रवादी पुरस्कृत सहकार पॅनेलच्या 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह माण, खटाव, कोरेगाव सोसायटी मतदारसंघात हायहोल्टेज लढती होत आहेत. या लढतीत सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रविवारी 21 उमेदवारांचे भवितव्य पेटी बंद होणार असल्याने गायब थेट मतदान केंद्रावरच दाखल होणार असल्याचे समजते.
कराड सोसायटी मतदारसंघातून बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात उदयसिंह पाटील-उंडाळकर हे निवडणूक लढवत असून, उदयसिंह उंडाळकर काँग्रेसचे दिवंगत माजी मंत्री विलास काकांचे पुत्र आहे. त्यामुळे उंडाळकर गटाचा दबदबा आहे. गेल्या निवडणुकीत काकांना 82 मतदान झाले होते. त्याअनुषंगाने आपल्या विश्वसनीय कार्यकर्त्यांचे सुमारे 85 ते 90 ठराव काकांनी यापूर्वीच करून ठेवल्याने उंडाळकर गटाने विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे बाळासाहेब पाटील यांचा मार्ग खडतर मानला जात आहे. मात्र, मतदारांचा कौल आपल्यालाच असल्याचा दावा पालकमंत्र्यांनी करत कराडात मेळाव्याद्वारे जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.
दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात पाटणमधून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांनी शड्डू ठोकला. मंत्री शंभूराज देसाई यांना विजय मिळवायचा असेल तर जिकिरीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.
राष्ट्रवादीचेच माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात आमदार शिवेंद्रराजे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते राष्ट्रवादीचे ज्ञानदेव रांजणे अशी लढाई होत आहे. शशिकांत शिंदे यांना जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा राखायचा असेल तर विजयश्री खेचूनच आणावी लागेल. एक वेळ संन्यास घेऊ पण माघार घेणार नाही अशी भूमिका घेणारे रांजणे नेमकी काय भूमिका घेता याकडे जिल्हाचे लक्ष लागून राहिले आहे. कोरेगावात शिवाजीराव महाडिक विरूद्ध सुनील खत्री व माणमध्ये मनोज पोळ विरूद्ध शेखर गोरे या दोन लढतीसुध्दा राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.
शेखर गोरे यांच्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांची माघार घेतल्याची माण तालुक्यात चर्चा आहे. त्यामुळे आमदार गोरे यांची मते शेखर गोरे यांना मिळणार का? याची उत्सुकता आहे. कोरेगावात जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा पत्ता कट करत शिवाजी महाडिक यांची वरिष्ठ पातळीवरून शिफारास झाली. येथील लढतही प्रतिष्ठेची बनली आहे. आमदार प्रभाकर घार्गे यांच्या समर्थकांनी गुलाल आमचाच यांचा दावा केला असून, राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलचे उमेदवार नंदू मोरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खास आहेत. त्यामुळे या लढतीत पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रविवारी मतदान होत असल्याने राजकीय तडजोडी आणि समीकरणे जुळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मंगळवारी (दि. 23) रोजी निकालानंतर जिल्हा बँकेच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट होणार असून, जिल्हा बँकेत मतदारांनी यशवंत विचार जपला की नाही हे त्याचवेळी स्पष्ट होणार आहे.