नवी दिल्ली: मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला आरोपी तहव्वुर राणाला गुरुवारी अमेरिकेतील कडक सुरक्षेच्या बंदोबस्तात भारतात आणण्यात आले. त्याआधी अमेरिकेने कॅलिफोर्नियामधील अधिकृत कारवाईनंतर राणाला भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.संध्याकाळी ६.२२ वाजता दिल्लीतील पालम विमानतळावर त्याचे विमान उतरले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि तत्काळ राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने त्याला अटक केली.
अटकेनंतर तहव्वुर राणाला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात सुनावणी दरम्यान अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ही सुनावणी बंद खोलीत पार पडली. एनआयएने राणाविरुद्ध ईमेलसह इतर ठोस पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे.
दहशतवादाशी संबंधित गंभीर आरोप असलेल्या तहव्वुर राणाचे भारतात प्रत्यर्पण होणे हे सरकारसाठी एक मोठे राजनैतिक यश मानले जात आहे. मात्र, हा विजय पूर्णत्वास नेण्यासाठी, आता त्याच्याविरुद्ध योग्य ते पुरावे सादर करून न्यायालयात दोष सिद्ध करणे आवश्यक ठरेल. यासाठी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने तपासाची सूत्रे हातात घेतली असून, पुढील कारवाईसाठी कमर कसली आहे.
राणाचा खटला कोण लढणार?
तहव्वुर राणाच्या बचावासाठी अॅड. पियुष सचदेवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली कायदेशीर सेवा प्राधिकरण (DLSA) च्या वतीने त्यांची निवड झाली आहे. सचदेवा हे दिल्लीतील एक अनुभवी वकील असून, त्यांनी याआधीही अनेक गुंतागुंतीची आणि उच्च-प्रोफाईल गुन्हेगारी प्रकरणे हाताळली आहेत. कायद्याच्या विविध शाखांमध्ये त्यांना प्रावीण्य आहे. पियुष सचदेवा यांनी २०११ साली पुण्याच्या लॉ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि व्यावसायिक कायद्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे त्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यात सखोल ज्ञान आहे.
तहव्वुर राणाने हल्ल्यात बजावली होती ‘ही’ महत्त्वाची भूमिका; त्याच्यामुळेच
सरकारची बाजू कोण मांडणार?
सरकारच्या वतीने या प्रकरणात विशेष सरकारी वकील नरेंद्र मान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नरेंद्र मान हेही एक अत्यंत अनुभवी वकील असून, त्यांनी यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागासाठी (CBI) विशेष सरकारी वकील म्हणून काम केले आहे. २०१८ मध्ये झालेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) पेपर लीक प्रकरणातही त्यांनीच सरकारी बाजूने युक्तिवाद केला होता. त्यामुळे त्यांचा अनुभव अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये उपयुक्त ठरणार आहे.
सध्या काय स्थिती आहे?
एनआयएला सध्या राणाची १८ दिवसांची कोठडी मिळाली आहे. पटियाला हाऊस कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी एनआयएने असा युक्तिवाद केला की, राणाशी संबंधित अनेक गोष्टी अजून उलगडायच्या आहेत. त्याने भारताविरुद्ध कट रचण्यासाठी इतर दहशतवाद्यांशी संपर्क साधल्याचा संशय आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या प्रकरणात अनेक महत्त्वाचे अपडेट्स येण्याची शक्यता आहे.