टेंभुर्णी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : माढा आणि करमाळा मतदारसंघातून एकाच वेळी दोन सख्खे भाऊ विधानसभेत पहिल्यांदाच पाठविण्याची किमया माढा तालुक्यातील जनतेने केली आहे. जनतेने आम्हाला दिलेल्या ताकतीचा उपयोग आम्ही लोकांच्या भल्यासाठी करणार असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले.
भिमानगर तालुका माढा येथे रविवारी सायंकाळी पाणीपुरवठा व विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तर जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुढे बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले की, आमच्या विरोधात असलेले माजी कृषी सभापती संजय पाटील भीमानगरकर यांनी उशीरा का होईना आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. आम्ही बरेच दिवस पाटील यांना इकडं येण्यासाठी आग्रह करत होतो. आता इथून पुढे जनतेची कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार बबन शिंदे म्हणाले की, भीमानगर गावठाण वाढीचा प्रस्ताव तयार करून दिल्यास मंजूर करून देण्यात येईल. तसेच भीमानगर पर्यटन क्षेत्र होण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे हे प्रयत्नशील आहेत. एकतर बोलायचे नाही अन् बोललं तर खोटं कधी बोलायचं नाही. जे बोलतो ते करुनच दाखवतो. राजकारणात एका ताटात बसल्यावर जात कुणाची विचारायची नाही. ही आमच्या शिंदे कुटुंबाची पद्धत असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वेताळ जाधव, उपसभापती धनाजी जवळगे, माढा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रमेश पाटील, सरपंच सोनाली माने , भरत मस्के, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग घाडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.