मुंबई : क्रिकेटमधील सुपरस्टार विराट कोहली (Virat Kohli) हा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि धोनी (MS Dhoni) नंतर भारतीय क्रिकेटला मिळालेला एक हिराच आहे. या क्रिकेटमधील सुपरस्टारने क्रिकेटच्या जगतात अनेक नवे रेकॉर्ड बनवले आणि अनेक दिग्गजांचे रेकॉर्ड मोडले देखील. मात्र आता क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या विराट कोहली बद्दल एक मोठी माहिती समोर आलेली आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसीच्या टी २० वर्ल्ड कपनंतर (ICC T20 World Cup) विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२२ टीम इंडियाचा बॅट्समन विराट कोहलीसाठी खूप यशस्वी ठरली. या स्पर्धेपूर्वी तो अतिशय खराब फॉर्ममध्ये होता, पण या स्पर्धेत कोहलीची बॅटिंग खूपच चांगली झाली. शेवटच्या मॅचमध्ये त्याने शतकही झळकावलं. विराट पुन्हा फॉर्ममध्ये परत येत असताना एका माजी क्रिकेटपटूने केलेल्या विधानामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) हे धक्कादायक विधान केलं आहे. विराट कोहली टी-२० वर्ल्डकप २०२२ नंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करेल, असा विश्वास शोएबला वाटतोय. पाकिस्तानचा माजी वेगवान बॉलर शोएब अख्तर लाइव्ह सेशन सुरू असताना विराटच्या निवृत्तीवर म्हणाला, ‘विराट कोहली टी-२० वर्ल्डकप २०२२ नंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेईल. तो हे करू शकतो, जेणेकरून त्याला क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमध्ये जास्त काळ खेळता येईल. त्याच्या जागी मी असतो तर भविष्याचा विचार करून हाच निर्णय घेतला असता.’
पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनेही (Shahid Afridi) अलीकडेच विराटला निवृत्तीचा सल्ला दिला होता. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलशी बोलतातना आफ्रिदी म्हणाला होता की, ‘विराट कोहलीने त्याच्या करिअरची चांगली सुरुवात केली होती. तो चॅम्पियन खेळाडू आहे. पण एक वेळ अशी येते जेव्हा तुम्हाला निवृत्ती घ्यावी लागते. अशावेळी तुम्ही तुमच्या करिअरच्या शिखरावर असताना निवृत्तीची घोषणा केली पाहिजे.’ विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत अशी वक्तव्यं येऊ लागल्याने मात्र त्याच्या चाहत्यांना विराटपर्व संपणार का? हा प्रश्नही सतावू लागलाय. मात्र, खुद्द विराट कोहलीने स्वतःच्या निवृत्तीबद्दल कोणतंही वक्तव्य केलेल नाही.
पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीने विराटला दिलेल्या सल्यानंतर भारताचा लेग स्पिनर अमित मिश्राने शाहिद आफ्रिदीवर टीका केली आहे. अमित मिश्राने (Amit Mishra) ट्विट करून आफ्रिदीला या विषयापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
Dear Afridi, some people retire only once so please spare Virat Kohli from all this. ?? https://t.co/PHlH1PJh2r
— Amit Mishra (@MishiAmit) September 13, 2022