महाभारातातील दानशूर आणि धर्मनिष्ठ पराक्रमी योद्धा म्हणजे कर्ण. महाभारतात कौरव आणि पांडवाचं सत्तेसाठीचं युद्ध ही मुख्य बाजू असली तरी कृष्णाप्रमाणे कर्ण देखील मुख्य व्यक्ती होता. अर्जुनापेक्षा धनुर्धारी कोण तर तो होता कर्ण. या कर्णाची दुर्योधनाप्रति मैत्री होती. सूर्यपूत्र कर्णाला जन्मत: कवच कुंडलं होती. मात्र युद्ध जिंकण्यासाठी हीच कवच कुंडलं कपटाने कर्णाकडून काढून घेण्यात आली. इतकं सगळं होऊनही कर्णाला युद्धात हरवणं सहज शक्य नव्हतं. मित्रासाठी प्रामाणिक असणारा, पराक्रमी आणि प्रामाणिक योद्धा तसचं दानशूर असं व्यक्तीमत्व असूनही कर्णच्या पदरी कायमच उपेक्षा पडली. मात्र आजही महाभारतातील या कर्णाबाबत अनेकांच्या मनात त्याच्या प्रति आदर आहे. याच कर्णाचं एक मंदिर आहे. तसंच कर्ण ज्या ठिकाणी स्नानासाठी जात असे त्या नदीची पूजा आजही भक्ती भावाने केली जाते. कुठे आहे हे ठिकाण जाणून घेऊयात.
भगवान शिवाच्या आशिर्वादाने पावन झालेली भूमी म्हणजे उत्तराखंड. या भूमीला धार्मिकदृष्ट्या मोठं मह्त्व प्राप्त आहे. याच उत्तराखंडमध्ये कर्णप्रयाग म्हणून एक ठिकाण आहे. या ठिकाणाला भेट देण्यास भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात वसलेले एक प्रसिद्ध धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले ठिकाण म्हणजे कर्णप्रयाग. हे स्थळ पंचप्रयागांपैकी एक आहे, जिथे अलकनंदा आणि पिंडर नदीचा संगम होतो. “प्रयाग” म्हणजे संगम, आणि “कर्ण” हे नाव महाभारतातील शूरवीर योद्धा कर्णावरून आले आहे.
पुराण कथेनुसार असं म्हटलं जातं की, कर्णाने इथेच भगवान सूर्यदेवाची तपश्चर्या केली होती. सूर्यदेवांनी प्रसन्न होऊन त्याला दिव्य कवच व कुंडले दिली, जे त्याच्या अजिंक्य असण्य़ाचं प्रतीक होतं. इथेच कर्णाने आपले अंतिम दान केले आणि म्हणून हे स्थान ‘कर्णप्रयाग’ म्हणून ओळखले जाते. अनेक भक्त आणि पर्यटक येथे कर्णावरच्या प्रेमापोटी या ठिकाणाला भेट देतात.
कर्णप्रयाग येथे अनेक मंदिरे आहेत, त्यापैकी कर्ण मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. शिवमंदिर, उमा देवी मंदिर देखील प्रमुख तीर्थस्थळे आहेत. येथे आलेले भक्त संगमात स्नान करून पुण्य मिळवतात आणि अध्यात्मिक समाधान अनुभवतात.कर्णप्रयाग म्हणजे पवित्रता, परंपरा आणि निसर्ग यांचा अनोखा संगम. उत्तराखंडच्या पंचप्रयागांपैकी हे एक विशेष महत्त्वाचं ठिकाण आजही लोकांच्या श्रद्धेचं आणि ऐतिहासिक महत्त्वाचं प्रतीक आहे.श्रद्धा, दान आणि तपश्चर्या यांचा संगम असलेलं ठिकाण म्हणजे कर्णप्रयाग असं म्हटलं जातं. या ठिकाणी आलेले भाविक मोठ्या दान धर्म मोठ्या प्रमाणात करतात. या कर्णप्रयागाजवळ छोटसं कर्णाचं मंदिर देखील आहे. महाभारतात प्रामाणिक राहून मैत्री, धर्म आणि बंधूनिष्ठा पाळून देखील कर्णाच्या वाट्याला फक्त आणि फक्त निराशा आली होती. एक कणखर योद्धा असण्याबरोबरच कर्ण निस्वार्थ नाती जपणारा प्रेमळ देखील होता याची या ठिकाणी आल्यावर प्रचिती येते.