chanakyaniti
आचार्य चाणक्य यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक गोष्टींविषयी भाष्य केलेले आहे. प्राचीन काळात लिहिण्यात आलेल्या या नीतिशास्त्रात समाज, राजकारण, धर्म आणि कर्माविषयी अनेक गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. यातील जीवनमूल्ये आजही तितकीच कालसुसंगत आहेत. या नीतिशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वागल्यास माणूस कधीही अपयशी ठरणार नाही, असे मानले जाते. त्यामुळेच आजही अनेक लोक या नीतिशास्त्राचे तंतोतंत आचरण करू पाहतात.
कोणालाही आपल्या आयुष्यात एक चांगला जीवनसाथी हवा असतो, जो जीवनाच्या प्रत्येक निर्णयात त्याची साथ देईल, जो वाईट काळ असो व चांगला आपल्या पाठीशी उभे राहायला नेहमी तत्पर असेल. अनेकदा लग्नासाठी मुलगी बघायला जाताना तिच्यातील काही गुण पाहिले जातात. चाणक्यनीतीमध्ये देखील लग्नासाठी स्त्रीमधील नक्की कोणते गुण पाहावेत यासाठीची काही लक्षणे सांगितलेली आहेत. चाणक्यांच्या मते, ज्या स्त्रीमध्ये हे गुण असतील त्या स्त्रीसोबत लग्न केल्याने पुरुषाचे भाग्य उजळेल आणि त्याला लाभच लाभ होईल. चला तर मग जाणून घेऊयात नक्की कोणत्या गुणांचा यात समावेश आहे.
चाणक्याच्या मते, जी स्त्री आपल्या जोडीदारावर प्रेम करते, सतत त्याची काळजी करते ती स्त्री आपल्या जोडीदाराला कधीही सोडून जाणार नाही. अशा स्त्रीबरोबर कधी वाद जरी झाला तरी तो लगेच सोडवला पाहिजे. कारण अशी स्त्री आपल्या जोडीदाराच्या चांगल्या आणि वाईट काळात पहाडासारखी त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहील.
चाणक्य सांगतात, जी स्त्री बाहेरील सौंदर्याहून अधिक मनाच्या सौंदर्याला महत्त्व देते, अशा स्त्रीशी विवाह करावा. शारीरिक सौंदर्य काहीकाळाने निघून जातं मात्र मनातील भाव, स्वभाव कधीही बदलला जात नाही. आंतरीक सौंदर्याला महत्त्व देणारी स्त्री कधीही आपल्या जोडीदाराला सोडून जात नाही.
चाणक्यांच्या मते, जि स्त्री घरातील ज्येष्ठांचा आदर करते, त्यांना मान-सन्मान देते तसेच कुटुंबातील छोट्यांवर प्रेम करते अशा स्त्रीशी लग्न कारण एक उत्तम पर्याय ठरेल. अशी स्त्री आयुष्य सार्थकी लावण्यास आपल्या जोडीदाराची मदत करते.
चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात लिहिले आहे की, जी स्त्री धार्मिक आहे तिच्याशी लग्न केल्याने तुमचे आयुष्य उजळून जाईल. याचे कारण म्हणजे, धार्मिक वृत्तीची माणसं कधीही वाईट मार्गाला जात नाहीत. धर्माच्या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं.