डेंग्यूच्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका जास्त, संशोधनातून समोर आला नवा अहवाल (फोटो सौजन्य - pinterest)
भारतात दरवर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. डेंग्यूच्या वाढत्या आजारामुळे अनेकदा रुग्णांचा जीव जाताना देखील पाहायला मिळतो. तसंच या डेंग्यूच्या आजारामुळे रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका देखील वाढत आहे. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका संशोधन अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. डेंग्यूमुळे हृदयरोगींना जास्त धोका असतो.
हेदेखील वाचा- मर्दा बॉडी बनवायची आहे का? मग घरच्या घरी करायला घ्या ‘हे’ व्यायाम
डेंग्यू हा आजार डासांच्या चावण्याने होतो. डेंग्यूमुळे माणसाला खूप ताप येतो आणि शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊ लागतात. अधिक तीव्रतेचा ताप, डोळे आणि डोके दुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल व्रण उठणे, तळहात आणि तळपायांना खाज येणे, भूक कमी लागणे किंवा मळमळणे, हिरड्यांमधून अथवा नाकातून रक्तस्त्राव होणे आणि प्रचंड अशक्तपणा येऊन भोवळ येणे ही डेंग्यूच्या आजाराची लक्षणं आहेत.
घरांच्या अवती-भवती अथवा टेरेस वर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूंमध्ये पावसाचं पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. ज्यामुळे डेंग्यूच्या आजारात वाढ होते. आजारावर योग्यवेळी उपचार न केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू होण्याची देखील शक्यता असते. याशिवाय डेंग्यू तापामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा देखील धोका वाढतो, असे संशोधनातून समोर आले आहे.
सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली डेंग्यूचा आजार आणि हृदयाशी संबंधित आजारांवर संशोधन करण्यात आले आहे. संशोधनात असे समोर आले आहे की कोविड-19 च्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांना हृदयविकाराचा धोका 55 टक्के जास्त असतो. जर्नल ऑफ ट्रॅव्हल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 11,700 हून अधिक डेंग्यू रुग्ण आणि 12 लाखांहून अधिक कोविड-19 रुग्णांच्या वैद्यकीय डेटाचे परीक्षण आणि विश्लेषण करण्यात आले.
हेदेखील वाचा- लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मुगाच्या डाळीचा कुरकुरीत डोसा
या संशोधनातून समोर आलं की, डेंग्यू हा कोविड-19 पेक्षा जास्त धोकादायक आहे. प्रमुख लेखक लिम जु ताओ, नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधील संसर्गजन्य रोग मॉडेलिंगचे सहाय्यक प्राध्यापक म्हणाले की, डेंग्यू हा जागतिक स्तरावर सर्वात सामान्य वेक्टर-जनित रोगांपैकी एक आहे. डेंग्यूमुळे हृदयविकाराच्या अनेक समस्या निर्माण होतात.
देशात हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांच्या वाढत्या घटनांमागे कोविड-19 हे प्रमुख कारण मानले जात आहे. कोविड-19 नंतर हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, कारण दीर्घकाळापर्यंत या तापामुळे रक्तात गुठळ्या होतात. त्यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज सुरू होते, परंतु डेंग्यू हा कोविड-19 पेक्षा जास्त प्रभावी असल्याचे बोलले जात आहे. डेंग्यूनंतर हृदयाच्या आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. संशोधनानुसार भविष्यात डेंग्यूचा शरीरावर अनेक प्रकारे गंभीर परिणाम होऊ शकतो. अनेक प्रकरणांमध्ये, गंभीर डेंग्यूमुळे यकृताचे नुकसान, मायोकार्डिटिस आणि न्यूरोलॉजिकल समस्या देखील होऊ शकतात.