
हातमागावर तयार करण्यात आलेली पैठणी साडी
महाराष्ट्रामध्ये हातमागावर तयार करण्यात आलेल्या पैठणी साडीला एक वेगळाच इतिहास लाभला आहे. जगभरात प्रसिद्ध असलेली पैठणी साडी नेसल्यानंतर महिला अधिक उठावदार आणि सुंदर दिसतात. महाराष्ट्रातील सर्वच महिलांना पैठणी साडी नेसायला आवडते. या साडीवर तयार करण्यात आलेले मोर, बारीक नक्षीकाम, रंग यामुळे ही साडी सगळीकडे प्रसिद्ध आहे. पैठणी साडी विकत घेण्यासाठी महिला हजारो रुपये मोजायला देखील तयार असतात. पण अनेकदा पैठणी साडी विकत घ्यायला घेल्यानंतर महिला गोंधळून जातात.
बदलत्या फॅशन आणि ट्रेंडनुसार सगळीकडे डिझायनर साड्यांप्रमाणे पैठणी साडीमधील काही नवनवीन रंग, वेगवेगळ्या डिझाइन्स ट्रेंडमध्ये आल्या आहेत. पैठणी साडीमध्ये दोन प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे हातमागावर विणण्यात आलेली पैठणी आणि दुसरी म्हणजे मशीनवर तयार करण्यात आलेली पैठणी साडी. मशीनवर पैठणी तयार होत असल्याने अनेक ठिकाणी महिलांची फसवणूक केली जात आहे. अनेकदा हातमागावर विणण्यात आलेली पैठणी साडी ओळखणे कठीण होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खरी पैठणी साडी कशी ओळखायची याबद्दल काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स तुम्हाला तुम्ही पैठणी साडी विकत घ्याला गेल्यानंतर उपयोगी पडतील.(फोटो सौजन्य-इंस्टाग्राम)
पैठणी साडी
जगभरात पारंपरिक साडी म्हणून पैठणीचे नाव घेतले जाते. या पैठणी साडीचे दोन प्रकार आहेत. त्यातील एक हातमागावर विणण्यात आलेली खरी पैठणी. आणि दुसरी म्हणजे मशीनचा वापर करून तयार करण्यात आलेली पैठणी. हाताने तयार करण्यात आलेल्या पैठणी साडीचा लूक हा मशीनवर तयार करण्यात आलेल्या पैठणी साडीपेक्षा वेगळा आहे.
पैठणी साडी (फोटो सौजन्य-इंस्टाग्राम/ ssudamini handloom )
हातमागावर तयार करण्यात आलेली पैठणी ओळखणे कठीणच आहे. पण पैठणी साडी ओळखण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर पैठणी साडी खरेदी करताना गोंधळ उडणार नाही. हातमागावर तयार करण्यात आलेल्या पैठणीचे धागे पदराच्या दोन्ही बाजूंनी सारखेच दिसतात. साडी तयार करताना यातील धागे कुठेच कापले जात नाहीत. तसेच पैठणी साडीवर तयार करण्यात आलेली डिझाईन दोन्ही बाजूने सारखीच असते. साडीच्या धाग्यांमध्ये समानता दिसून येते. साडीचा पदर आणि बॉर्डर सारखी असते. ही सर्व हातमागावर तयार करण्यात आलेल्या खऱ्या पैठणी साडीची वैशिष्ठ्य आहेत. हातमागावर तयार करण्यात आलेल्या साडीची जर कधीच काळी पडत नाही. सण समारंभाच्या काळात मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते. त्यामुळे साडी विकत घेताना खरी पैठणी कोणती हे ओळखणे आवश्यक आहे.
पैठणी साडी तयार करण्यासाठी हातमाग यंत्राचा वापर केला जातो. पैठणी साडी तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो. तसेच साडी बनवण्यासाठी शुद्ध जर आणि रेशमाचा वापर केला जातो. त्यामुळेच ही साडी 3 ते 4 पिढ्या व्यवस्थित टिकते. शुद्ध जर आणि रेशीम वापरून हातमागावर तयार करण्यात आलेल्या एका साडीची किंमत 10 ते 25 हजारांच्या आसपास आहे. पैठणी साडीची किंमत ही तिच्यावर करण्यात आलेल्या नक्षीकाम आणि साहित्यावर अवलंबून असते.