

राम खांदारे
स्त्रीबीजदानाला समाजाचा संकोच, व्यवस्थेची मर्यादा
स्त्रीबीजदान प्रक्रियेतील नियम आणि वास्तव काय?
अनधिकृत व्यवहारांचा मुद्दा ऐरणीवर
आजकालच्या बदलत्या काळात महिलांच्या अधिकारांबाबत चर्चा रंगत असली, तरी प्रजनन आरोग्याच्या बाबतीत महिलांना अजूनही पूर्ण मोकळीक मिळालेली नाही, हे वास्तव बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज विक्री प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. वैद्यकीयदृष्ट्या कायदेशीर असलेली स्त्रीबीज दान प्रक्रिया प्रत्यक्षात अनेक महिलांना 'दान' करण्याऐवजी लपूनछपून करावी किंवा विकावी का लागते, हा प्रश्न या प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे. (Egg Donation in India)
आर्थिक गरज, बेकायदेशीर एजंटांचे जाळे, सामाजिक दबाव आणि अधिकृत व्यवस्थेतील मर्यादा अशा अनेक बाबींची बंधने महिलांवर आजही आहेत. अनेकदा या व्यवहारात दलालीचे जाळे निर्माण होते आणि कुठे तरी त्यात मतभेद निर्माण झाल्यावरच अशी प्रकरणे बाहेर येत असल्याची टीका होत आहे. वंध्यत्व उपचारांमध्ये शुक्राणू दान आणि स्त्रीबीज दान या दोन्ही प्रक्रिया महत्त्वाच्या असल्या, तरी त्यांच्यातील फरक लक्षणीय आहे.
तज्ज्ञांच्या मते, वैद्यकीयदृष्ट्या बीजांडांची गरज वाढत असली, तरी प्रत्यक्षात उपलब्धता कमी असल्याचे चित्र दिसते. राज्यात अनेक एआरटी क्लिनिक कार्यरत असली, तरी अधिकृत एआरटी बँकांची संख्या तुलनेने मर्यादित आहे. विशेषतः ग्रामीण भागात अशा सुविधा अत्यल्प असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परिणामी काही ठिकाणी बेकायदेशीर एजेंट किंवा दलाल सक्रिय होऊन स्त्रीबीज व्यवहारांचे अनधिकृत जाळे तयार होत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते.
भारतामधील पहिल्या फर्टिलिटी क्लिनिकपैकी एक चालवणाऱ्या डॉ. अंजली मालपानी याच्या मते, बीजांड दानासाठी एआरटी बैंक असणे आवश्यक असते; मात्र कडक कायदेशीर अटींमुळे अशा बँकांची संख्या मर्यादित राहिली आहे. नियमांनुसार डोनर महिला आयुष्यात केवळ एकदाच बीजांड दान करू शकते आणि एका वेळी जास्तीत जास्त सात अंडी काढण्याची परवानगी असते.
माँ आयव्हीएफ केंद्राचे, डॉ. अंजली मालपानी म्हणाले की, एका डोनर महिलेसाठी बीजांड तयार करण्यासाठी साधारणा चार ते पाच लाख रुपये खर्च येतो. इंजेक्शन दिल्यानंतर नियमानुसार सात अंडी घेता येतात; मात्र त्यापैकी अनेकदा एकच अंड फलद्रूप होते. ते यशस्वी झाले नाही, तर पुन्हा नवीन डोनर शोधावी लागते. त्यामुळे मूल हवे असलेल्या जोडप्याचा लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता असते.