शेवग्याच्या शेंगांचे आरोग्यदायी फायदे
मागील अनेक वर्षांपासून आहारामध्ये शेवग्याच्या शेंगाचे सेवन केले जात आहे. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने आरोग्याला अनेक गुणकारी फायदे होतात. या झाडाची पाने, फुले, भाजी सर्व गोष्टी गुणकारी आहेत. या झाडाच्या चमकत्कारिक गुणधर्मांमुळे याला ‘जीवनाचे झाड’ असे देखील बोलले जाते. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, अमीनो ॲसिड आणि आवश्यक खनिजे आढळून येतात, जी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. वयाच्या तिशीनंतर महिलांची शारीरिक शक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे महिलांनी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. रोजच्या आहारात महिलांनी शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने आरोग्याला नेमके काय फायदे होतात, हे जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
हाडांचे आरोग्य मजबूत राहण्यासाठी आपण अनेक पदार्थ खातो. पण हे पदार्थ काही वेळेस आरोग्यासाठी तितके उपयोगी ठरत नाहीत. त्यामुळे महिलांनी रोजच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते. दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम यामध्ये असते. कॅल्शियम आणि फॉस्फरस समृद्ध असलेल्या शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा प्रभावी आहेत. चरबीचे विघटन करण्यास मदत करून शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढू देत नाहीत. चयापचय वाढून कॅलरी बर्न करण्यास शेवग्याच्या शेंगा मदत करतात.
वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या जाणवतात. शेवग्याच्या शेंगा शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. तसेच हार्मोनल संतुलित ठेवण्यास शेवग्याच्या शेंगा मदत करतात.
शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने आरोग्यालाच नाही तर त्वचेला सुद्धा फायदे होतात. त्वचेचे आरोग्य सुधारून त्वचा चमकदार आणि उठावदार दिसू लागते. यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी, ए हे गुणधर्म असल्याने त्वचेला फायदे होतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.