फोटो सौजन्य - Social Media
प्रेम ही भावना मनाच्या अगदी खोल भागात खोलवर रुजते. कुणावर मनापासून प्रेम करणं, त्याच्यासोबत भविष्याचं स्वप्न पाहणं, आणि अचानक त्या नात्याचा शेवट होणं ही भावना आतून हलवून टाकणारी असते. नातं तुटतं तेव्हा फक्त दोन व्यक्ती दुरावत नाहीत, तर त्या दोघांमध्ये उभं राहिलेलं विश्वासाचं, आठवणींचं आणि स्वप्नांचं जगच कोसळतं. पण हे सगळं घडलं तरी, आयुष्य इथेच थांबत नाही. खरं तर, ही वेळ असते स्वतःला पुन्हा नव्यानं शोधण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची.
कधी कधी रडणंही गरजेचं असतं. डोळ्यात साठलेलं सगळं ओघळून गेलं की मन हलकं होतं. लिहा, बोला, मोकळं व्हा, पण मनात ठेऊन त्याच वेदनेत अडकू नका. घडलेल्या गोष्टी स्वीकारण्यास शिका. उगाच मनात आशेचं किरण बाळगू नका. अपेक्षा ठेवाल तर जगण्यात आणि मरण्यात फार काही अंतर उरणार नाही.
तुम्हाला हसवणारी जुनी गोष्ट आठवा, आवडतं गाणं ऐका, पुस्तकात हरवा स्वतःला. सकाळच्या चहात, पावसातल्या थेंबात, उन्हातल्या शांततेत! आयुष्य अजून सुंदर आहे. आयुष्याला मर्यदित करू नका. त्या व्यक्तीला आयुष्य मनात असाल पण आता ती व्यक्ती नाहीये तर का म्हणून त्यातच रमून राहायचं? स्वतःला नवीन दिशा द्या.
तुम्ही एकटं आहात याचा अर्थ तुम्ही दुर्बळ नाही. एकटं असणं आणि एकटं वाटणं यामध्ये फरक असतो. आपल्या भावना शेअर करा, आईबाबांशी, मित्रांशी, किंवा डायरीशी! आता तर अनेक AI चॅटही उपल्बध आहेत, कुणी मिळालं नाही तर तुमच्या गोष्टी तिथे शेअर करा पण मनात घुमसटून राहू नका.
नातं टिकवणं हे दोघांचं काम असतं. जर एकाने खूप प्रयत्न करूनही नातं टिकलं नाही, तर त्याला अपयश म्हणता येणार नाही. काही नाती आपल्याला जीवन शिकवायला येतात आणि त्यातून आपण अधिक मजबूत, अधिक समजूतदार होतो. हा तुमच्यासाठी एक धडा आहे, असं समजा. आयुष्यात अनेक समस्यां येतात अहो! त्या समस्यांना तोंड देण्यासाठी, हा एक प्रकारचा सराव आहे, असं समजा.
पुन्हा कुणावर प्रेम करायचं की नाही, हे नंतर ठरवा. पण आज स्वतःवर प्रेम करा. स्वतःच्या हसण्यात, उर्जेमध्ये, शांततेत पुन्हा स्वतःला ओळखा. प्रेम हे पुन्हा होईलच! कदाचित असे नाही होईल पण यामध्ये स्वतःला गुन्हेगार कधीच समजू नका. स्वतःवर प्रेम असू द्या. स्वतःला त्रास करून नका घेऊ. जसं तुम्ही त्या व्यक्तीसाठी होता तसे तुमच्यासाठीही कुणी तरी आहे, जी तुम्हाला जीव लावत असेल तर त्यांचा विचार असू द्या. त्यांच्यासाठी जगा.
कधी कधी शेवट असतो एक नव्या सुरुवातीचा संकेत!