फोटो सौजन्य - Social Media
प्रत्येकाच्या आयुष्यात Toxic माणसे असतात. अशा लोकांपासून चार हाताचा अंतर ठेवणेच उत्तम आहे. जर त्यांच्याशी तुमची मैत्री असेल तर अशांवर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारून घेणे आहे. मित्राचा अर्थ आहे जो अडीअडचणीला, प्रत्येक सुखा दुःखात आपल्या पाठीशी आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा असतो. पण जर मित्राचे नाते सांगणारा एखादा व्यक्ती मित्र म्हणून आपल्या पाठीशी उभा राहतो आणि पाठीवरच वार करण्याचा प्रयत्न करतो तर अशांशी मैत्री ठेवायचीच कशाला? जर तुमच्या आयुष्यात असणाऱ्या अशा लोकांची पारख करणे तुम्हाला जमत नसेल तर हा लेख नक्की वाचा आणि अशा लोकांपासून अंतर करण्यास सुरुवात करा.
सच्चा मित्र तुमच्या चांगल्या गोष्टींवर स्तुती करेल, पण गरज पडल्यास तुमच्या चुका दाखवायलाही तो मागेपुढे पाहणार नाही. तो नेहमी प्रामाणिक प्रतिक्रिया देईल. पण Toxic मित्र मात्र प्रत्येक गोष्टीला फक्त होकार देतील, सतत स्तुतीच करतील, आणि तुमच्या प्रत्येक चुकीला पाठिंबा देतील. त्यामुळे कोण तुमच्या भल्यासाठी बोलतो आणि कोण फक्त दिखावा करतो, हे ओळखायला शिका. पण इथे मित्र म्हणून भावना असणाऱ्यांची गोष्ट आहे. एखादा जर तुमच्यावर प्रेम करत असेल तर त्याला तुमच्या प्रत्येक गोष्टी आवडतील. तुमच्यात असलेल्या कमतरता त्या व्यक्तीला कधीच दिसून येणार नाहीत.
मैत्री म्हणजे फक्त एकत्र फोटो काढणे, पार्टी करणे आणि फिरणे नव्हे, तर खरा मित्र तुमची खरी काळजी करतो. तो रोज संपर्कात नसला, सतत फोनवर बोलत नसला तरीही गरज पडल्यास तुमच्यासाठी वेळ काढेल आणि तुमची चौकशी करत राहील. पण बनावटी आणि स्वार्थी मित्र मात्र फक्त चांगल्या काळात तुमच्यासोबत राहतील. गरज पडल्यावर मात्र ते वेगवेगळे बहाणे काढून तुमच्यापासून दूर जातील. त्यामुळे एकदा तरी कोणाला मदतीसाठी विचारून पाहा आणि खरा मित्र कोण हे स्वतः अनुभवा.
जेव्हा तुम्ही उदास असाल किंवा काही अडचणीत असाल, तेव्हा खरा मित्र तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तो तुमची काळजी करतो आणि तुम्हाला आधार देतो. पण बनावटी मित्र मात्र तुमच्या भावना समजून घेण्याऐवजी केवळ तुमच्या समस्येमागची “गुपितं” शोधण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला उगाचच कुरतडतात. त्यामुळे कोण आपल्याला आधार देतो आणि कोण फक्त आपल्याबद्दल जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतो, हे नीट ओळखा.