shahu maharaj (फोटो सौजन्य - pinterest )
‘श्वानाची समाधी’ हे वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे, साताऱ्यात एका श्वानाची समाधी आहे. या श्वानाचा नाव खंड्या असे होते. शेकडो वर्षांपासून ही समाधी इतिहासाची साक्ष देत उभी आहे. छत्रपती शाहू महाराज यांनी खंड्याची समाधी बांधली. ही प्रसिद्ध समाधी साताऱ्याच्या संगम माहुली येथे आहे. या खंड्या नावाच्या श्वानाची समाधी लाल दगडामध्ये बांधलेली आहे. सुमारे ३५० वर्ष पूर्वीपासूनची ही समाधी असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.
कोणत्या छत्रपतींशी जुळलेला आहे इतिहास
मराठा साम्राज्य भारतभर नेणारे छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी ही समाधी बांधली होती. शाहू महाराजांचे प्राण्यांवर विशेष प्रेम होते. त्यांच्याकडे देशभरातले जवळपास सर्वच प्राणी आणि पक्षी होते. शाहू महाराजांकडे असलेल्या बसंत, बंता, मिठू या कुतेवनाची नावे इतिहासामध्ये आढळतात. त्यांच्या बागेमध्ये वाघ, चित्ता अश्या हिंस्र प्राण्यांचाही समावेश होता. त्यांनी पशु पक्ष्यांसाठी विशेष तरतुदी केल्याचे दाखले इतिहासात आहेत. छत्रपती शाहूंच्या श्वान आणि हत्ती प्रेमाबाबत काही कथाही सातारा परिसरात सांगितल्या जातात.विशेष म्हणजे शाहू महाराजांना श्वानाचा जास्त लळा होता. ‘खंड्या’ नावाचा श्वान नेहमी त्यांच्यासोबत असायचा. या श्वानाने एकदा शिकारीला गेल्यावर शाहू महाराजांचे प्राण वाचवल्याचे सांगितले जाते.
खंड्या श्वानाने कसे वाचवले प्राण
छत्रपती शाहू महाराज एकदा शिकारीला गेले होते. शिकारी दरम्यान त्यांच्यावर हत्ती हल्ला करणार होता, ही बाब खंड्या श्वानाला कळली. तेव्हा, खंड्या श्वानाच्या भुंकण्याने अनर्थ टळला आणि महाराज धोक्यातून वाचले.
खंड्याला पालखीचे मान
खंड्या महाराजांचा अत्यंत प्रिय होता. खंड्याच्या प्रामाणिक सेवेबद्दल शाहू महाराजांनी त्याला दरबारात बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. शाही श्वान म्हणून मान सन्मान दिला. तसेच त्याला पालखीचा मान देखील दिल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात.
खंड्या श्वानाच्या निधनानंतर छत्रपती शाहू महाराज यांनी संगम माहुली येथे त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर तिथे लाल दगडात त्याची समाधी बांधली. एका चौथऱ्यावर श्वानाची दगडी मूर्ती त्याठिकाणी बसवण्यात आली आहे. संगम माहुलीतील श्वानाची समाधी श्वानाच्या स्वामीनिष्ठेचं प्रतिक असल्याचंही सांगितलं जातं. 350 वर्षांपासून ही समाधी इतिहासाचा दाखला देत आहे.