
फोटो सौजन्य - Social Media
सध्या राज्यभरात थंडीचा जोर वाढलेला असून, दिवसा थंडी कमी जाणवत असली तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी कुडकुडणारी थंडी अनुभवायला मिळते. वातावरणातील गारठा वाढल्यामुळे घरातही थंडीचा प्रभाव जाणवतो. विशेषतः घरातील खिडक्या व दरवाजे उघडे असतील, तर थंड हवा थेट आत येऊन बेडरूम अधिक गार पडते. अशा परिस्थितीत थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण हिटर, ब्लोअर, रूम हीटरसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करतात. मात्र या उपकरणांचा सतत वापर केल्यामुळे विजेचे बिल मोठ्या प्रमाणात वाढते आणि महिन्याच्या शेवटी येणारा बिलाचा आकडा अनेकांना धक्का देणारा ठरतो. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळून घर, विशेषतः बेडरूम कशी उबदार ठेवता येईल, याबाबत काही सोप्या आणि किफायतशीर उपायांची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
थंडीच्या दिवसांत घर उबदार ठेवण्यासाठी सर्वात आधी खिडक्या आणि दरवाजांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा घरातील उघड्या खिडक्या आणि दरवाजांमधून मोठ्या प्रमाणात थंड हवा आत येत असते. ही हवा रोखण्यासाठी कार्डबोर्ड, थर्माकोल किंवा जाड कापडाच्या मदतीने खिडक्या आणि दरवाजे कव्हर करता येतात. यामुळे थंड वाऱ्याचा प्रवेश कमी होऊन खोलीतील तापमान काही प्रमाणात स्थिर राहते. तसेच खिडक्यांना जाड पडदे लावल्यासही उबदारपणा टिकून राहण्यास मदत होते.
थंडीपासून संरक्षणासाठी घरातील प्रकाश व्यवस्थेचाही उपयोग करता येतो. थंड पांढऱ्या लाईट्सऐवजी वॉर्म लाईट्सचा वापर केल्यास खोलीत उबदार वातावरण तयार होते. यासोबतच सुरक्षित पद्धतीने मेणबत्त्यांचाही वापर करता येतो. मेणबत्त्यांमुळे सौम्य उष्णता मिळतेच, शिवाय खोलीला एक आरामदायी आणि शांत वातावरणही मिळते. मात्र मेणबत्त्या वापरताना सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे.
बेडरूम उबदार ठेवण्यासाठी बेडवरील अंथरुणाचाही मोठा वाटा असतो. अनेकजण अंगावर जाड ब्लँकेट किंवा गोधडी घेतात, मात्र बेडवर पातळ कॉटनची चादर अंथरतात. अशा पातळ चादरीमुळे थंडी अधिक जाणवू शकते. यासाठी बेडवर जाड आणि उबदार बेडशीट्स अंथरणे फायदेशीर ठरते. यामुळे झोपताना शरीराला अधिक उबदारपणा मिळतो आणि झोपही अधिक शांत लागते.
हिवाळ्यात फरशीही थंडीने गार पडते. सकाळी उठल्यावर किंवा रात्री चालताना थंड फरशीवर पाय ठेवताना गारवा जाणवतो. यासाठी फरशीवर उबदार मॅट, गालिचे किंवा दरी अंथरणे उपयुक्त ठरते. यामुळे थंडीचा थेट संपर्क टाळता येतो आणि खोलीत उबदारपणा टिकून राहतो. या सर्व सोप्या उपायांचा अवलंब केल्यास, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांशिवायही आपण आपली बेडरूम आणि घर थंडीच्या दिवसांत उबदार व आरामदायी ठेवू शकतो.