
साहित्य :
सर्वात प्रथम एका बाऊल मध्ये मैदा घ्या आणि त्यात तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व व्यवस्थित मिसळून घ्या. पिठाचा जर मुटका बनत असेल तर समजायचं की आपण जेवढं तेल घातलं ते पिठाला पुरेसे आहे. आता मैद्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा बनवून घ्या. हा तयार गोळा १५-२० मिनिट बाजूला झाकून ठेवा म्हणजे तो छान मऊ बनेल. पिठाचा गोळा मऊ होईपर्यंत आपण कचोरीचे स्टफिंग बनवून घ्या.
तुम्ही एक पॅन घ्या. त्यामध्ये धण्याचे दाणे, जिरे आणि बडीशेप घाला आणि हे तिन्ही व्यवस्थित भाजून घ्या. धने,जिरे आणि बडीशेप व्यवस्थित भाजून झाल्यावर एक छानसा सुगंध येतो. त्यानंतर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची जाडसर पूड बनवून घ्या. आता पूड प्लेट मध्ये काढून घ्या आणि त्याच भांड्यात हिरवी मिरचीचे तुकडे, लसूण पाकळ्या आणि आल्याचे काप घाला आणि त्याची पेस्ट बनवून घ्या. आता पॅनमध्ये तुमच्या अंदाजानुसार तेल तुम्ही घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे घाला आणि व्यवस्थित तडतडू द्या. जिरे,मोहरी छान तडतडले की त्यात आले ,लसूण, मिरचीची पेस्ट घाला आणि छान तेलामध्ये परतून घ्या. याचा मस्त घमघमाट सुटतो. पेस्ट छान परतून झाली की त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर आणि कसूरी मेथी हातावर चुरडून घाला आणि सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्या.
मसाले छान परतून झाले की त्यात बेसन घाला आणि बेसन छान भाजेपर्यंत त्याला कमी गॅसवर परतत रहा. बेसनाचा छान सुगंध यायला लागला की समजायचं की आपल बेसन छान भाजले आहे. आता त्यावर थोडा थोडा पाण्याचा हबका मारा. बेसन छान ओले होईल एवढं पाणी घाला आणि परता नंतर चवीप्रमाणे मीठ घाला आणि बेसन २ ते ३ मिनिट झाकून ठेऊन कमी गॅसवर शिजवून घ्या. आपले कचोरीचे स्टफिंग तयार आहे. स्टफिंग थंड व्हायला ठेवा.
आता पिठाची कणीक घेऊन त्याचे छोटे छोटे गोळे बनवून ठेवा. हाताने तुम्ही या पिठाचा पुरीचा आकार बनवा. ही पुरी मध्ये जाड असायला हवी आणि त्याचे काठ पातळ असायला हवेत. आता त्यात तयार स्टफिंग घाला आणि स्टफिंग व्यवस्थित आतमध्ये दाबून घ्या आणि कडा एकत्र करून वरचा जो पिठाचा भाग येतो तो तिथेच दाबून त्याला गोल गोल फिरवून घ्या. आता पोळपाट वर ठेवून हा गोळा हलक्या हाताने लाटून घ्या आणि अशाप्रकारे सर्व कचोरी तयार करून घ्या. आता कढईमध्ये तेल आला आणि ते गरम होऊ द्या..तेल गरम झाल्यावर त्यात कचोरी घालून मध्यम आचेवर कचोरी तळून घ्या. गरमागरम शेगाव कचोरी तयार आहे. तुम्ही शेगाव कचोरी हिरवी चटणी अथवा सॉससह खायला सर्व्ह करा.