दुसरी गर्भधारणा का लवकर होत नाही काय आहे समस्या (फोटो सौजन्य - iStock)
पहिल्या बाळानंतर दुसऱ्या बाळासाठी अनेकदा काही वर्षांचे अंतर असते. या काळात महिलेचे वय वाढते. वय वाढल्यानंतर स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी होऊ लागते. त्यामुळे गर्भधारणा होण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो असे स्पष्टपणे डॉ. रश्मी निफाडकर, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, बाणेर, पुणे यांनी सांगितले.
Monsoon Tips: पावसाळ्याच्या ऋतूत गर्भधारणेचे नियोजन करताय? मग, फॉलिक अॅसिड घ्यायला विसरु नका
वयाच्या २७व्या वर्षी सहज गर्भधारणा झालेल्या महिलेला काही वर्षांनंतर, उदाहरणार्थ ३४ किंवा ३६व्या वर्षी, पुन्हा गर्भधारणा होण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यामुळे पहिल्यांदा गर्भधारणा झाली होती म्हणून दुसऱ्यांदा ती सहज होईलच असे नाही.
पहिल्या बाळानंतर महिलेचे वजन वाढणे, थायरॉईड, मधुमेह, पीसीओएस किंवा इतर हार्मोन्सच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते आणि अंडे तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळेही गर्भधारणेला विलंब होऊ शकतो.
गर्भधारणेसाठी केवळ महिलेचे आरोग्य महत्त्वाचे नसते. पुरुषांच्या आरोग्याचाही त्यावर परिणाम होतो. वाढते वय, वजन वाढणे, धूम्रपान, मद्यपान, ताणतणाव किंवा काही आजारांमुळे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे गर्भधारणा होत नसल्यास महिला आणि पुरुष दोघांचीही तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यास अडचण येत असल्यास पहिल्या गर्भधारणेचा आणि प्रसूतीचा इतिहासही पाहिला जातो. प्रसूतीदरम्यान काही अडचण आली होती का, त्यानंतर काही आजार किंवा शस्त्रक्रिया झाली का, याची माहितीही महत्त्वाची ठरते.
गरजेनुसार मासिक पाळी नियमित आहे का, अंडे तयार होत आहे का, स्त्रीबीजांचा साठा किती आहे, गर्भाशय आणि गर्भनलिकांची स्थिती कशी आहे तसेच पुरुषांच्या वीर्याची गुणवत्ता कशी आहे, याची तपासणी केली जाऊ शकते.फर्टिलिटी तपासणी म्हणजे लगेच आयव्हीएफ करावे लागेल असे नाही. गर्भधारणा होण्यास नेमकी अडचण कुठे आहे, हे समजून घेण्यासाठी या तपासण्या केल्या जातात.
पहिल्यांदा गर्भधारणा सहज झाली होती म्हणून दुसऱ्यांदाही तशीच होईल, असे प्रत्येक वेळी घडतेच असे नाही. त्यामुळे बराच काळ प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल, मासिक पाळी अनियमित असेल किंवा महिलेचे वय वाढलेले असेल, तर योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांदा गर्भधारणा होण्यास वेळ लागतोय म्हणजे गर्भधारणा होणारच नाही, असा त्याचा अर्थ नसतो.
Ans: बरेचदा वयात असणारं अंतर यासाठी कारणीभूत ठरतं
Ans: आरोग्यतज्ज्ञांच्या मते किमान दोन वर्षांचं अंतर दोन्ही मुलांमध्ये असावे
Ans: होय, तुमची डिलिव्हरी सिझेरियन की नॉर्मल डिलिव्हरी कशी झाली आहे, याचा पुढील गर्भधारणेवर नक्कीच फरक पडतो.






