पावसाळ्यात गर्भधारणेचा विचार करत असाल तर काय खावे (फोटो सौजन्य - iStock)
गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या महिलांनी गर्भधारणेपूर्वी किमान तीन महिने फॉलिक अॅसिडचे सेवन सुरू करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. फॉलिक अॅसिड हे व्हिटॅमिन बी-९ चे एक रूप असून बाळाचा मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. डॉ. पायल नारंग, प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे यांनी अधिक महत्त्वाची माहिती दिली आहे.
फॉलिक अॅसिड किती महत्त्वाचे
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत, अनेकदा महिलेला गर्भधारणा झाल्याची जाणीव होण्यापूर्वीच गर्भातील न्यूरल ट्यूबची निर्मिती सुरू झालेली असते. या काळात शरीरात फॉलिक अॅसिडची कमतरता असल्यास स्पायना बिफिडा आणि अॅनेन्सेफलीसारख्या न्यूरल ट्यूब दोषांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गर्भधारणेचा प्रयत्न सुरू करण्यापूर्वी सुमारे तीन महिने फॉलिक अॅसिडचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
फॉलिक अॅसिडची पुरेशी साठवण शरीरात तयार होण्यासाठी काही काळ आवश्यक असतो. त्यामुळे गर्भधारणा निश्चित झाल्यानंतरच फॉलिक अॅसिड सुरू केल्यास बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या सुरुवातीच्या विकासासाठी महत्त्वाचा कालावधी निघून गेलेला असू शकतो.
बाळाच्या निरोगी वाढीस मदत करण्याबरोबरच फॉलिक अॅसिड शरीरात निरोगी लाल रक्तपेशी तयार होण्यास सहाय्य करते आणि गर्भधारणेदरम्यान उद्भवणाऱ्या काही गुंतागुंतींचा धोका कमी करण्यासही मदत करू शकते.
महिन्यातून 5 दिवसात सहज होऊ शकता Pregnant, 24 तासात संपुष्टात येते 20% क्षमता; तज्ज्ञांचा खुलासा
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?
आई आणि वडील दोघांनीही आपल्या आहारात पालक, ब्रोकोली, मसूर, कडधान्ये, लिंबूवर्गीय फळे आणि फोर्टिफाइड धान्ये यांसारख्या फोलेटयुक्त पदार्थांचा समावेश करावा. मात्र, केवळ आहारातून आवश्यक प्रमाणात फोलेट मिळेलच असे नाही. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉलिक अॅसिडच्या गोळ्या घेण्याची शिफारस केली जाते. मधुमेह, लठ्ठपणा, अपस्मार (एपिलेप्सी) किंवा जन्मजात दोषांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी गर्भधारणेपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन फॉलिक अॅसिडची योग्य मात्रा आणि इतर आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात.
फॉलिक अॅसिडच्या सेवनासोबतच संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, वजन नियंत्रित राखणे, तंबाखू व मद्यपानाचे सेवन टाळणे आणि आधीपासून असलेल्या आजारांचे योग्य व्यवस्थापन करणेही तितकेच गरजेचे आहे. गर्भधारणेपूर्व आरोग्य तपासणीमुळे पोषणातील कमतरता, प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या आणि गर्भधारणेवर परिणाम करू शकणारे इतर घटक वेळीच ओळखता येतात.
गर्भधारणेपूर्वी केलेली तयारी ही आई आणि बाळ दोघांनाही निरोगी व सुरक्षित गर्भधारणेचा आनंद देते. पालकत्वाची योजना आखत असाल, तर आजपासूनच फॉलिक अॅसिड सेवन करा आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करा.






