Arthritis: संधिवाताचा त्रास होतोय? वेदना आणि सूज कमी करण्यासाठी जाणून घ्या हे महत्त्वाचे उपाय!

Arthritis: संधिवातामुळे सांध्यांमध्ये वेदना, सूज आणि आखडलेपणा जाणवत असल्यास योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नियमित हलका व्यायाम, गरम किंवा थंड शेक, संतुलित आहार, वजन नियंत्रण आणि पुरेशी विश्रांती यामुळे त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, योग्य निदान आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
Arthritis(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Arthritis(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित हलका व्यायाम, स्ट्रेचिंग आणि पोहण्यासारख्या हालचाली करा.

  • सांध्यांचा आखडलेपणा कमी करण्यासाठी गरम शेक, तर सूज आणि जळजळ असल्यास कापडात गुंडाळून थंड शेक देऊ शकता.

  • संतुलित आहार, वजन नियंत्रण आणि योग्य वैद्यकीय उपचारांमुळे संधिवाताची लक्षणे नियंत्रित ठेवण्यास आणि सांध्यांचे नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते.

संधिवात म्हणजे सांध्यांमध्ये वेदना, सूज, आखडलेपणा आणि हालचाल करताना त्रास होण्याची समस्या. बदलती जीवनशैली, वाढते वय आणि रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित काही विकारांमुळे संधिवात होऊ शकतो. संधिवाताचे ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमेटॉइड आर्थरायटिस असे वेगवेगळे प्रकार आहेत. विशेषतः रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून सांध्यांवर हल्ला करते. त्यामुळे सांध्यांमध्ये सूज आणि वेदना निर्माण होतात. सकाळी उठल्यानंतर हातापायांचे सांधे आखडणे, बोटांना सूज येणे आणि सांधे दुखणे ही त्याची काही सामान्य लक्षणे आहेत. योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे हा त्रास नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

१. नियमित व्यायाम करा.

सतत पाय दुखल्यामुळे अनेक महिला पुरुष चालणे आणि व्यायाम थांबवतात. पण व्यायामाची शरीराला तितकीच गरज असते जितकी औषधांची असते.

संधिवाताचा त्रास असल्यास पूर्णपणे हालचाल बंद करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याने चालणे, पोहणे, हलके स्ट्रेचिंग आणि योगासने करा. यामुळे सांध्यांची लवचिकता टिकवण्यास आणि स्नायू मजबूत करण्यास मदत होते.

Arthritis(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Skincare: हात-पायांवरील पिग्मेंटेशन कमी करायचे आहे? जाणून घ्या त्वचेची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

२. गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्या.

सांध्यांमध्ये आखडलेपणा जाणवत असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्या. यामुळे स्नायूंना आराम मिळू शकतो.स्नायूंमधील दुखणे देखील होईल. सांध्यांना सूज किंवा जळजळ असल्यास कापडात गुंडाळलेल्या बर्फाने थंड शेक दिल्याने आराम मिळू शकतो.

३. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा.

संधिवाताचा त्रास असणाऱ्यांनी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी, नट्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असणारे पदार्थ समाविष्ट करा.हे पदार्थ स्नायूंच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात. जवस, अक्रोड आणि मासे हे त्याचे चांगले स्रोत आहेत. संतुलित आहारामुळे एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

४. वजन नियंत्रणात ठेवा.

वाढलेल्या वजनामुळे गुडघे आणि पायांच्या सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो.त्यामुळे ते अजून च दुखू लागायला सुरुवात होते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराची मदत घ्या.

५. पुरेशी विश्रांती घ्या.

संधिवातामध्ये शरीराला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक आहे. मात्र दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहू नका. कामाच्या दरम्यान थोडे चालणे आणि हलक्या हालचाली करणे फायदेशीर ठरते.

Arthritis(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Air fryer foods: एअर फ्रायरमध्ये बनवा चविष्ट पदार्थ, कमी तेलात तयार होतील कुरकुरीत स्नॅक्स आणि गोड पदार्थ

६. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.

संधिवातावर उपचार न केल्यास काही प्रकारांमध्ये सांध्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. त्यामुळे सांध्यांमध्ये सतत वेदना, सूज किंवा सकाळी दीर्घकाळ आखडलेपणा जाणवत असल्यास रुमेटोलॉजिस्टचा सल्ला घ्या. औषधे, फिजिओथेरपी आणि आवश्यक तपासण्यांच्या मदतीने संधिवात नियंत्रित ठेवता येतो.संधिवाताचे योग्य वेळी उपचार होणे गरजेचे असते हे जाणून घ्या आणि योग्य वेळी निदान करा.

महत्त्वाचे : संधिवात पूर्णपणे बरा होईलच असे नाही; मात्र योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास वेदना कमी करून सांध्यांचे नुकसान टाळण्यास मदत होऊ शकते. घरगुती उपाय हे वैद्यकीय उपचारांना पर्याय नाहीत.