फोटो सौजन्य - Social Media
उन्हाळ्याच्या दिवसांत जशी थंड पदार्थांची आणि फळांची रेलचेल असते, तसाच काही आजारांचा धोका देखील वाढतो. यामध्ये डोळ्यांच्या संसर्गाचा धोका सर्वाधिक असून, ऊन, धूळ, घाम आणि हवेत असलेले विषाणू-जीवाणू मिळून डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांची नाजूक त्वचा आणि रेटिना यावर दुष्परिणाम होतो. UV किरणांमुळे डोळ्यांमध्ये जळजळ, कोरडेपणा आणि कधी-कधी संक्रमणही होऊ शकते. यासोबतच उन्हाळ्यात वातावरणात उडणारी धूळ आणि प्रदूषण देखील डोळ्यांमध्ये जाऊन त्रासदायक ठरू शकतात. अनेकदा डोळे लाल होणे, खाज येणे किंवा कंजंक्टिव्हायटिस (डोळा येणे) होण्याची शक्यता असते.
तसेच घामामुळे आपण अनेक वेळा हात न धुता डोळ्यांना स्पर्श करतो, ज्यामुळे बॅक्टेरिया किंवा व्हायरस थेट डोळ्यांमध्ये जातात. उन्हाळ्यात स्विमिंगचा ट्रेंडही वाढतो आणि अशा वेळी पूलमधील क्लोरीनयुक्त किंवा दूषित पाण्यामुळे डोळ्यांमध्ये संसर्ग होऊ शकतो.
या सगळ्या गोष्टींपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, डोळ्यांना सूर्यप्रकाश आणि धुळीपासून वाचवण्यासाठी UV प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस किंवा गॉगल्स वापरणे अत्यंत फायदेशीर ठरते. हे गॉगल्स केवळ सुर्यप्रकाशापासूनच नव्हे तर वातावरणातील उडणाऱ्या सूक्ष्म धुळीपासूनही डोळ्यांचे संरक्षण करतात. हात स्वच्छ न करता डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे, कारण अनेक वेळा हातांवर असलेले बॅक्टेरिया किंवा विषाणू डोळ्यांत जाऊन संक्रमण होण्याची शक्यता वाढवतात. विशेषतः घाम येत असताना किंवा डोळ्यांमध्ये खाज आली असताना हात न धुता डोळ्यांभोवती स्पर्श करू नये. दिवसातून दोन ते तीन वेळा स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे धुणे आवश्यक आहे, यामुळे डोळ्यांतील धूळ, घाण आणि थकवा दूर होतो आणि डोळ्यांना ताजेपणा मिळतो.
तसेच इतरांचे वैयक्तिक वस्त्र वापरणे टाळावे, जसे की रुमाल, टॉवेल, पांढरं कपडं, काजळ किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मेकअप, कारण अशा वस्तूंमधून संसर्ग सहज पसरतो. मुलांना याची विशेष काळजी घेण्यास सांगावे कारण त्यांना अशा गोष्टींचे भान नसते. डोळ्यांना अधिक काळ निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप आणि वेळच्या वेळी डोळ्यांची तपासणी करून घेणे देखील महत्त्वाचे आहे. ही सर्व खबरदारी घेतल्यास उन्हाळ्याच्या दिवसांत डोळ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवता येऊ शकते.
मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप सतत पाहिल्यामुळे डोळ्यांना थकवा येतो आणि कोरडेपणाही जाणवतो. त्यामुळे दर 20 मिनिटांनी 20 सेकंद दूर बघण्याचा ‘20-20 नियम’ पाळावा. स्विमिंगनंतर लगेच डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि काही त्रास जाणवत असल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यात डोळ्यांची योग्य काळजी घेतल्यास संसर्गाचा धोका कमी करता येतो आणि डोळे निरोगी राहतात.