
फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात आर्थिक साक्षरता ही केवळ मोठ्यांसाठीच नव्हे, तर लहान मुलांसाठीही तितकीच आवश्यक झाली आहे. पालक म्हणून आपण अनेक गोष्टी मुलांना शिकवतोसवयी, नीतीमूल्यं, स्वच्छता – पण पैशांबाबत मात्र आपण गप्प राहतो. बहुतेक पालकांना वाटतं की ७-८ वर्षांचा मुलगा/मुलगी अजून खूप लहान आहे, त्याला पैशांची काय समज? पण तज्ज्ञांच्या मते हीच वय मुलांना आर्थिक शिस्त आणि पैशांची किंमत शिकवण्यासाठी योग्य असते.
७ वर्षांपासूनची वय ही मुलांची कुतूहलाची वय असते. ते प्रत्येक गोष्टीबाबत प्रश्न विचारतात “हे का घेतलं?”, “पैसे कुठून येतात?”, “ATM म्हणजे काय?” अशा प्रश्नांचं उत्तर देण्याऐवजी आपण त्यांना चिडचिडीत थोपवतो किंवा दुर्लक्ष करतो. पण जर आपण त्यांना समजेल अशा भाषेत पैशांबद्दल सांगायला सुरुवात केली, तर लहानपणापासूनच ते आर्थिकदृष्ट्या जागरूक बनतात.
ज्या घरांमध्ये पैशांबाबत मोकळं वातावरण असतं, तिथली मुलं भविष्यकाळात आर्थिक निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेतात. पैसे खर्च करताना विचार करतात, बचत कशी करावी हे शिकतात आणि भविष्यात मोठे आर्थिक संकट टाळू शकतात. उलटपक्षी, जर लहानपणी त्यांना याची माहिती दिली नाही, तर वय वाढल्यावर ‘लोन’, ‘इंटरेस्ट’, ‘क्रेडिट स्कोअर’ यासारख्या मोठमोठ्या संज्ञा ऐकून ते घाबरतात.
आजकालचे तरुण क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवत आहेत, युट्युबवर आणि सोशल मीडियावर मोठा नफा दाखवणाऱ्या लोकांचा प्रभाव त्यांच्यावर पडतो. पण योग्य मार्गदर्शन नसेल तर फसवणुकीचे बळी ठरतात. त्यामुळे गुंतवणूक, धोका आणि व्यवहार यांचा पाया लहान वयातच घालायला हवा. मुलांना खेळाच्या माध्यमातूनही आर्थिक साक्षरता देता येते. नकली नोटा, खरेदी-विक्रीचे खेळ, खिशातील पैशांवर महिन्याचा खर्च मॅनेज करणं. या सगळ्यांतून त्यांना पैशाचं मोल समजतं. आज जरी हे खेळ वाटत असले, तरी याचं बीज पुढे जाऊन ‘बजेटिंग’, ‘सेव्हिंग’, ‘इन्शुरन्स’ यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकण्यास उपयोगी ठरतं.
म्हणूनच, पालकांनी ७-८ वर्षांच्या वयापासूनच मुलांशी पैशांबाबत मोकळेपणाने बोलायला हवं. त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं, त्यांना निर्णय घेण्याची सवय लावावी. ही सवय त्यांना जबाबदार नागरिक आणि भविष्यकाळात आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती बनवेल.