फोटो सौजन्य - Social Media
युरिक अॅसिड वाढल्यामुळे शरीरात सांधेदुखी, सूज, कडकपणा आणि गाठीसारख्या त्रासदायक समस्या होऊ शकतात. मात्र काळजी करण्याची गरज नाही, कारण संतुलित आहारासोबत नियमित योगासनांचा सराव केल्यास युरिक अॅसिड नैसर्गिकरीत्या नियंत्रणात ठेवता येतो. काही विशिष्ट योगासन शरीरातील विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर टाकण्यात, मूत्रपिंडाची कार्यक्षमता सुधारण्यात आणि सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यात अत्यंत फायदेशीर ठरतात.
वज्रासन हे एकमेव योगासन आहे जे जेवणानंतरही करता येते. हे पचन सुधारते आणि त्यामुळे युरिक अॅसिड तयार होण्याची प्रक्रिया थांबते. हे करण्यासाठी गुडघ्यांवर बसावे, पायांच्या एढ्यांवर वजन देऊन पाठीला ताठ ठेवावे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून डोळे बंद करून ५ ते १० मिनिटे गाढ श्वास घेणे फायदेशीर ठरते. दररोज या आसनाचा सराव युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवतो.
बालासन शरीराला आराम देते आणि सांध्यांतील जडपणा कमी करते. हे करण्यासाठी गुडघ्यांवर बसून वरचा भाग पुढे झुकवून कपाळ जमिनीवर टेकवावे. दोन्ही हात पुढे सरळ पसरवून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. या स्थितीत ३० सेकंद ते १ मिनिट राहावे. हा योगासन युरिक अॅसिड कमी करण्यात मदत करतो.
भुजंगासनामुळे किडनी सक्रिय होते आणि शरीरातून युरिक अॅसिड बाहेर टाकले जाते. हे करण्यासाठी पोटावर झोपा, दोन्ही हात खांद्याजवळ ठेवा आणि हळूहळू छाती वर उचला. या स्थितीत १५ ते ३० सेकंद राहावे. अर्ध मत्स्येन्द्रासनमुळे यकृत आणि किडनी डिटॉक्स होतात. हे करण्यासाठी उजवा पाय डाव्या मांडीजवळ ठेवून, डावा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा आणि शरीर उजवीकडे वळवावे. या स्थितीत २० ते ३० सेकंद थांबून नंतर बाजू बदलावी. सेतूबंधासन रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे सांधेदुखी आणि सूज कमी होते. हे करण्यासाठी पाठ जमिनीवर ठेवून झोपा, पाय वाकवून पायाचे तळवे जमिनीवर ठेवावेत. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवून कंबर वर उचलावी. या स्थितीत २० ते ३० सेकंद थांबावे.
पवनमुक्तासन पचन सुधारते आणि शरीरातून वायू व विषारी घटक बाहेर टाकतो. हे करण्यासाठी पाठीवर झोपा, दोन्ही पाय वाकवून छातीशी आणा, दोन्ही हातांनी गुडघे पकडा आणि डोकं वर उचला. या स्थितीत ३० सेकंद राहावे. नियमित योगाभ्यास केल्यास युरिक अॅसिड नियंत्रणात राहते आणि सांधेदुखी, सूज यांसारखे त्रास दूर ठेवता येतात. शरीर निरोगी व हलकं राहण्यासाठी हे योगासन नित्यक्रमात अवश्य समाविष्ट करावेत.