

परफ्यूमचे Parfum, Eau de Parfum, Eau de Toilette, Eau de Cologne, बॉडी मिस्ट आणि रोल-ऑन असे विविध प्रकार आहेत.
सुगंधी तेलांचे प्रमाण, सुगंधाची तीव्रता आणि टिकण्याचा कालावधी यानुसार परफ्यूमचे प्रकार वेगवेगळे असतात.
परफ्यूम निवडताना त्वचेचा प्रकार, हवामान, वैयक्तिक आवड आणि वापरण्याचा प्रसंग लक्षात घ्यावा.
स्वतःला दिवसभर फ्रेश आणि सुगंधित ठेवण्यासाठी अनेकजण परफ्यूमचा वापर करतात.परफ्युम मध्ये विविध प्रकार असल्यामुळे प्रत्येक जण आपल्याला आवडेल असे परफ्युम वापरत असतो पण प्रत्येक परफ्युम वर त्यांच्या नावांच्या खाली इओ डी परफ्यूम,इओ डी टॉयलेट, इओ डी कोलोन असे लिहिलेलं असतं. ऑफिस, पार्टी, लग्नसमारंभ किंवा रोजच्या वापरासाठी वेगवेगळ्या सुगंधांचे परफ्यूम बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, परफ्यूम खरेदी करताना त्याचे प्रकार, सुगंधी तेलांचे प्रमाण आणि सुगंध किती वेळ टिकतो, याची माहिती असणे गरजेचे असते. परफ्यूममध्ये असणाऱ्या सुगंधी तेलांच्या प्रमाणानुसार त्यांचे विविध प्रकार केले जातात. चला तर जाणून घेऊया परफ्यूमचे काही लोकप्रिय प्रकार जाणून घेऊया.
परफ्यूम हा सर्वाधिक सुगंधी तेलांचे प्रमाण असलेला प्रकार मानला जातो. यामध्ये साधारणपणे २० ते ३० टक्के सुगंधी तेल असते. त्यामुळे याचा सुगंध त्वचेवर साधारण ६ ते १२ तास किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतो. विशेष कार्यक्रम, पार्टी आणि लग्नसमारंभासाठी हा चांगला पर्याय ठरतो.खूप वेळ चालणाऱ्या कार्यक्रमांसाठी हे परफ्यूम उत्तम ठरतात. याची किंमत इतर प्रकारांच्या तुलनेत अधिक असू शकते.
इओ डी परफ्यूममध्ये साधारणपणे १५ ते २० टक्के सुगंधी तेल असते. याचा सुगंध साधारण ४ ते ८ तास टिकू शकतो. रोजच्या वापरासाठी तसेच ऑफिस किंवा बाहेर जाताना हा लोकप्रिय पर्याय आहे.तसेच तुम्ही डेटवर जात असाल तर हे इओ डी परफ्यूम प्रकारामधले परफ्यूम योग्य ठरेल.यामध्ये फ्लोरल, फ्रुटी आणि वुडी अशा सुगंधाचा समावेश होऊ शकतो.
या प्रकारात साधारणपणे ५ ते १५ टक्के सुगंधी तेल असते.जर तुम्हाला अति सुंगंधीत परफ्यूमचा वापर करायला आवडत नसतील तर तुमच्यासाठी हे इओ डी टॉयलेट प्रकारातील परफ्यूम उपयुक्त ठरतील. याचा सुगंध तुलनेने हलका असून साधारण ३ ते ६ तास टिकू शकतो. उन्हाळ्यात किंवा दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी अनेकजण या प्रकाराला पसंती देतात. याचा वापर रोजच्या दिनचर्येत सहज करता येतो.
इओ डी कोलोनमध्ये साधारणपणे २ ते ५ टक्के सुगंधी तेल असते. याचा सुगंध हलका आणि ताजेतवाना असतो.काही व्यक्तींना अति सुगंधचा त्रास होतो.त्यांनी इओ डी कोलोन हे परफ्युम वापरावे. लिंबू, संत्री यांसारख्या सिट्रस सुगंधांचा यामध्ये अधिक वापर केला जातो. याचा सुगंध साधारण २ ते ३ तास टिकू शकतो.
बॉडी मिस्ट हा परफ्यूमच्या तुलनेत हलका सुगंध देणारा प्रकार आहे.हा प्रकार स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. यामध्ये सुगंधी घटकांचे प्रमाण कमी असते.त्याचबरोबर आपल्या शरीरला हे फ्रेश ठेवते. आंघोळीनंतर किंवा घराबाहेर जाताना याचा वापर करता येतो. याचा सुगंध कमी काळ टिकत असल्याने आवश्यकतेनुसार पुन्हा वापरता येतो.
रोल-ऑन परफ्यूम लहान बाटलीमध्ये उपलब्ध असतो.हे महाविद्यालयीन विद्यार्थी वापरतात. हे दिसताना अत्तरासारखे दिसतात. त्याच्या मदतीने मनगट, मानेजवळ किंवा कानामागील भागावर सुगंध लावता येतो. हा वापरण्यास सोपा असून प्रवासात सोबत ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.तसेच फिरताना वापरण्यासाठी उत्तम ठरतात.
परफ्यूम निवडताना केवळ त्याचा सुगंध न पाहता त्वचेचा प्रकार, हवामान आणि वापरण्याचा प्रसंग यांचाही विचार करावा. परफ्यूम खरेदी करण्यापूर्वी तो त्वचेवर लावून त्याचा सुगंध तपासावा. संवेदनशील त्वचा असल्यास काळजी घ्यावी. तसेच परफ्यूम थेट डोळ्यांवर किंवा जखमेवर फवारू नये. आपल्या आवडीनुसार आणि गरजेनुसार योग्य परफ्यूम निवडल्यास दिवसभर सुगंधित राहण्यास मदत होऊ शकते.