फोटो सौजन्य - Social Media
आपण झोपत असताना बहुतेक वेळा स्वप्नं पाहतो, काही स्वप्नं इतकी विचित्र असतात की ती वास्तवात शक्यच नाहीत, तर काही स्वप्नं आपल्याला आपल्या मनातल्या इच्छा किंवा आठवणींशी जोडलेली वाटतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही स्वप्नं का पडतात? ती नेमकी कुठून येतात आणि त्यामागचं विज्ञान काय आहे तज्ज्ञांच्या मते, स्वप्न पाहणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आजही या बाबत वैज्ञानिक दृष्टिकोनातून निश्चित उत्तर नाही. मात्र काही सिद्धांत असे आहेत जे स्वप्नांच्या प्रक्रियेचं स्पष्टीकरण देतात. एक लोकप्रिय सिद्धांत म्हणतो की स्वप्नं पाहण्यामुळं आपल्या मेंदूला आठवणी आणि अनुभव एकत्र करण्यास, त्यांचं विश्लेषण करण्यास मदत होते. याशिवाय, स्वप्नं ही दिवसभरात येणाऱ्या अडचणी आणि भावनिक अवस्थेचं एक “रिहर्सल” असू शकतात.
आपण मुख्यतः स्वप्नं REM (Rapid Eye Movement) झोपेच्या टप्प्यात पाहतो. या टप्प्यात आपल्या डोळ्यांची हालचाल जास्त असते आणि मेंदूही अति सक्रिय असतो, अगदी आपण जागे असतानासारखा. संशोधनानुसार, मेंदूचा ब्रेनस्टेम हा REM झोपेस कारणीभूत असतो, तर फोरब्रेनमुळे स्वप्नं तयार होतात. जर ब्रेनस्टेमला इजा झाली, तर माणूस स्वप्नं पाहू शकतो पण REM झोपेत जात नाही, आणि जर फोरब्रेनला इजा झाली तर तो REM झोपेत जातो पण स्वप्नं पाहत नाही.
स्वप्नं नेहमीच विचित्र का असतात यामागे मेंदूतील न्यूरोकेमिकल्सचा संबंध असतो. REM झोपेदरम्यान काही न्यूरोट्रांसमीटर (जसे की एसिटाइलकोलाइन आणि डोपामाइन) अति सक्रिय होतात. हे मेंदूला अधिक क्रियाशील ठेवतात आणि स्वप्नं अधिक रंगीत व वास्तवसदृश वाटायला लावतात. याच वेळी, सेरोटोनिन, हिस्टामिन आणि नॉरएपिनेफ्रिनसारखे रसायने दबलेली असतात, ज्यामुळे स्वप्नं अधिक अकल्पित वाटू लागतात.
अनेक लोकांना दररोज स्वप्नं पडतात, परंतु जागं झाल्यावर त्याची आठवण राहत नाही. त्यामुळे, स्वप्न लक्षात ठेवायचं असल्यास, जागं झाल्यावर लगेचच ते लिहून ठेवणं फायदेशीर ठरतं. स्वप्नं ही केवळ मनाची कल्पना नसून, ती आपल्या अंतर्मनाशी जोडलेली एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते.