
World Thyroid Day
एक असा विकार ज्याचे परिणाम दररोज जाणवतात, दिसतात पण तरीही प्रत्येकाला समजतातच असे नाही. जगभरात लाखो लोकांना थायरॉईडचे आजार आहेत. मानेमध्ये असलेली थायरॉईड ही एक लहानशी ग्रंथी आपल्या शरीरात खूप मोठी भूमिका बजावते. पचन संस्था, शरीराची वाढ, विकास यावर नियंत्रण ठेवण्यात थायरॉईड ग्रंथीचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो.
त्यामुळे थायरॉईडशी संबंधित काहीही विकार झाल्यास शरीरातील इतर यंत्रणांचे कार्य देखील बिघडू शकते. जागतिक थायरॉईड दिन विशेषनिमित्त डॉ. संदीप सोनावणे, कन्सल्टन्ट, इंटर्नल मेडिसिन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक स्पष्टपणे सांगितले आहे. (फोटो सौजन्य – iStock)
थायरॉईड विकारांचे व्यवस्थापन
जागतिक थायरॉईड दिनानिमित्त काही महत्त्वाच्या पैलूंची माहिती करून घेऊ, जर तुम्हाला थायरॉईड असेल तर या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात आणि त्यांची नीट काळजी देखील घेतली गेली पाहिजे.
[read_also content=”गर्भधारणेदरम्यान करा थायरॉईड फंक्शन टेस्ट्स, किती गरजेचे https://www.navarashtra.com/lifestyle/world-thyroid-day-which-thyroid-functions-test-need-to-do-during-pregnancy-advised-by-experts-537564.html”]
थायरॉईड विकार म्हणजे काय
थायरॉईड विकाराचे दोन सर्वात महत्त्वाचे प्रकार – हायपोथायरॉइडिजम आणि हायपरथायरॉइडिजम. जेव्हा थायरॉईड ग्रंथीमधून पुरेसे हार्मोन्स स्त्रवत नाहीत तेव्हा हायपोथायरॉइडिजम होतो. थकवा येणे, वजन वाढणे आणि निराश वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. जेव्हा थायरॉईड ग्रंथी खूप जास्त प्रमाणात हार्मोन्स निर्माण करते तेव्हा हायपरथायरॉइडिजम होतो. हा विकार झालेली व्यक्ती खूप बारीक होते, हृदयाची धडधड वाढते.
पोषण आणि थायरॉईड
थायरॉईड विकार असलेल्या व्यक्तींनी जीवनशैलीकडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे. भरपूर ताणतणाव असल्यास तब्येत बिघडू शकते, हार्मोन्सचे संतुलन ढळू शकते. त्यासाठी योग, ध्यानधारणा किंवा नियमित व्यायाम यांचा समावेश दिनचर्येमध्ये केला गेला पाहिजे.
अजून एक आवश्यक घटक म्हणजे झोप. दररोज रात्री पुरेशा प्रमाणात शांत झोप लागणे थायरॉईडसाठी आणि एकंदरीत आरोग्य चांगले राहण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. दर रात्री ७ ते ९ तास झोप घेतली पाहिजे, झोपण्याच्या व उठण्याच्या निश्चित वेळा पाळल्या गेल्या पाहिजेत.
स्वयं-निदान
थायरॉईडची लक्षणे स्पष्टपणे दिसून येत असली तरी ते काहीतरी वेगळे आहे असा गैरसमज होणे सहजशक्य आहे. अशावेळी स्वतःच निदान करणे तुमच्या तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकते. थायरॉईडची समस्या आहे असा संशय येत असेल तर मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा सल्ला घ्या. अचूक निदान, वैयक्तिक देखभाल व उपचार हा आरोग्य चांगले राखण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
सारांश
थायरॉईड असंतुलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे वेळेवर घेतली पाहिजे, नियमितपणे डॉक्टरांना दाखवले पाहिजे, त्यांच्या सल्ल्यानुसार जीवनशैली व आहारामध्ये बदल केले पाहिजेत. थायरॉईड निरोगी असणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी काय करायला हवे याबाबतची जागरूकता जागतिक थायरॉईड दिनानिमित्त निर्माण करू या. थायरॉईडचे असंतुलन असल्यामुळे कोणाही व्यक्तीने निरोगी, कार्यक्षम जीवनाचा आनंद घेण्यापासून वंचित राहता कामा नये.