HSRP Issue : 15 ऑगस्टनंतरही 'या' वाहनांवर लागणार नाही दंड; कारणही आहे तसंच...
अकलूज / कृष्णा लावंड : शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांच्या सुरक्षेविषयी अनेक गोष्टी डोळ्यांसमोर ठेऊन एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) बसवून घेण्याचा आदेश काढला होता. जुन्या वाहनांची संख्या पाहता या नंबर प्लेट बसवण्यासाठी एकदा मुदत वाढही दिलेली आहे. परंतु, वाहनधारक या आदेशाकडे दुर्लक्ष करत असून, नवी नंबर प्लेट बसवण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत नाहीत.
अकलूज आरटीओ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये माळशिरस, माढा, सांगोला व करमाळा तालुके येतात. या चार तालुक्यामध्ये 2019 पूर्वीची सुमारे 2 लाख 24 हजार 733 वाहने आहेत. तर या नंबर प्लेट रजिस्ट्रेशन करण्यासाठी व प्लेट बसवण्यासाठी माळशिरस तालुक्यात 6, करमाळा 1, माढा 1, सांगोला 2 अशी अधिकृत सेंटर देण्यात आली आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरु आहे. परंतु, वाहनधारकांना कायद्याचा धाक वाटत नसल्यामुळे नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी ते टाळाटाळ करत आहेत. या चार तालुक्यात मिळून फक्त 11 हजार 252 वाहनधारकांनी आपल्या वाहनाला नवीन नंबर प्लेट बसवून घेतल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांनी दिली.
अमरसिंह गवारे म्हणाले, 30 जून 2025 पर्यंत नवी नंबर प्लेट बसवण्याची मुदत आहे. त्यानंतर या जुन्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अशा वाहनधारकांना 1 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. नंबर प्लेट बसवण्यासाठी काही अडचण येत असेल तर आमच्या हेल्पडेस्कशी किंवा मेल आयडी वरती संपर्क करावा.
चोरीच्या किंवा पासिंग नसलेल्या गाड्यांवर होणार परिणाम
गाड्या चोरी करणारे लोक चोरीच्या गाड्या खोलून इंजिन एकाला तर चेसी दुसऱ्याला विकायची असा गोरख धंदा करत होते. परंतु, आता नवीन नंबर प्लेट साठी रजिस्ट्रेशन करताना गाडीचा इंजिन व चेसी नंबर टाकावा लागतो. तो मॅच होणे गरजेचे आहे. नंबर मॅच नाही झाला तर रजिस्ट्रेशन होत नाही. जे लोक चोरीची गाडी घेऊन नंबर बदलून किंवा नंबर न टाकता गाडी वापरत होते, ते आता नवीन नंबर प्लेटमुळे शक्य होणार नाही. एकसारख्या पॅटर्नमध्ये नंबर प्लेट बनत असल्यामुळे दादा, मामा, काका, भाऊ अशाप्रकारच्या नंबर प्लेट आता बनणार नाहीत.