25,000 unauthorized street lights removed in Marathwada, MSEDCL appeals to save national wealth by avoiding wastage of electricity
औरंगाबाद : मराठवाड्यातील ग्रामीण व शहरी भागात अनधिकृतपणे लावण्यात आलेले पथदिवे काढण्याचे महावितरण कडून संबंधित यंत्रणेला आवाहन करण्यात आले होते. महावितरणने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या साडेतीन महिन्यात २५ हजार अनधिकृत पथदिवे काढण्यात आलेली आहेत. अनधिकृत पथदिव्यामुळे महावितरणचे होणारे विजेचे नुकसान टाळण्यासाठी ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. अनधिकृत पथदिवे काढून विजेचा अपव्यय टाळावा व राष्ट्रीय संपत्ती वाचवून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पथदिव्यांना महावितरणकडून विजेचा पुरवठा करण्यात येतो. शहर व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर पालिका, व महानगर पालिका यांच्यातर्फे गावे व शहरात पथदिवे लावण्यात आलेले आहेत. सदर पथदिवे चालू बंद करण्यासाठी स्वतंत्र स्ट्रीटलाईट फेज अर्थात स्वतंत्र तार लावण्यात येते. परंतु, बऱ्याच ठिकाणी स्वतंत्र फेजची उपलब्धता न करता संबंधित स्थानिक संस्थाद्वारे पथदिवे परस्पर लावण्यात आल्याचे महावितरण यंत्रणा, पथकांना व दौऱ्यात महावितरणचे प्रादेशिक सहव्यवस्थापकीय संचालक यांना निदर्शनास आले होते. सदर पथदिवे स्वतंत्र फेजला न जोडल्यामुळे २४ तास सुरु असतात. त्यामुळे विजेसारख्या राष्ट्रीय संपत्तीचे अपव्यय होतो. तसेच
महावितरणचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते.
तसेच काही ठिकाणी हायमास्ट पथदिवे विना मीटरचे सुरू असल्याचे आढळून आलेले आहेत. सदर हायमास्ट पथदिवे अधिकृत मीटर घेवूनच लावावेत. मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडलात ग्रामीण व शहरी भागात महावितरणतर्फे अनधिकृत पथदिवे काढण्याची मोहीम १७ जानेवारी २०२२ पासून सुरु करण्यात आलेली आहे. या बाबत सर्व संबंधितांना पत्राद्वारे सूचित करून सर्व पथदिवे स्वतः काढून घ्यावेत, अन्यथा विद्युत कायद्यानुसार या संस्थांवर वीजचोरीची कारवाई करण्याचा इशारा महावितरणकडून देण्यात आला होता. तसेच, मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही सादर निदर्शनास आणून देऊन पत्राद्वारे कळविण्यात आले होते. तसेच, औरंगाबाद विभागाचे विभागीय अधिकारी यांनाही पत्राद्वारे सदर बाब कळविण्यात आली होती. त्यांनी सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सर्व संबधितांना अनधिकृत पथदिवे काढण्यासंबंधी सूचित केले होते.
गेल्या जानेवारी पासून मराठवाड्यात २५ हजार अनधिकृत पथदिवे काढण्यात आलेले आहेत. अनधिकृत पथदिवे काढण्याची मोहीम यापुढेही सुरु राहणार आहे. संबंधित संस्थांनी अनधिकृत पथदिव्यामुळे होणारा विजेचा अपव्यय आणि राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान टाळावे. तसेच, महावितरणची होणारी वीज हानी टाळावी. अनधिकृत पथदिवे काढून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.