सोलापूर शहरासाठी उजनीतून पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरूवात
सोलापूर, पंढरपूर ,मंगळवेढा ,सांगोला आदी शहरे व भीमा नदी काठावरील गावे व वाड्यावस्त्यावरील नागरिक व पशुधनाच्या पिण्यासाठी म्हणून उजनी धरणातून 5 हजार क्युसेक्स विसर्गाने मंगळवारी 19 सप्टेंबर पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.
टेंभुर्णी : सोलापूर, पंढरपूर ,मंगळवेढा ,सांगोला आदी शहरे व भीमा नदी काठावरील गावे व वाड्यावस्त्यावरील नागरिक व पशुधनाच्या पिण्यासाठी म्हणून उजनी धरणातून 5 हजार क्युसेक्स विसर्गाने मंगळवारी 19 सप्टेंबर पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे औंज टाकळी व चिंचपूर या बंधाऱ्यातील पाणीसाठा एक ते दोन ऑक्टोबर पर्यंत पुरेल असा अंदाज असून पुढील नियोजनासाठी उजनीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्तानी केली आहे, त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा व सांगोला आदि नगरपालिकांनी देखील पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. उजनी धरण ते टाकळी बंधारा हे अंतर 232 किलोमीटर अंतर असून पाच हजार क्यूसेक्स वीसर्गाने सोडलेले पाणी या बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी दहा ते अकरा दिवस लागतात. त्यानुसार नियोजन करून 19 सप्टेंबरला दुपारी दोन वाजल्यापासून प्रथम सोळाशे क्यूसेक्स पाणी वीजनिर्मितीकक्षाद्वारे व सायंकाळपर्यंत धरणाच्या आठ दरवाजातून 3हजार400क्युसेक्स याप्रमाणे एकूण पाच हजार क्युसेक्स पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती धरण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी दिली आहे.
2023 च्या पावसाळ्याचे तीन महिने संपले असले तरी समाधानकारक पाऊस नाही ,त्यामुळे उजनी धरणात सध्या फक्त 23 टक्के पाणी असून 76 टीएमसी पाणीसाठा आहे व पाणी पातळी 492 मीटर असून येणारा विसर्ग फक्त 594 क्युसेक्स आहे .पिण्यासाठी म्हणून भीमा नदीत 11 दिवसात किमान पाच ते सहा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे, त्याचप्रमाणे कालवा ,बोगदा ,सीनानदी ,सीना- माढा व दहिगाव योजना यांच्या लाभक्षेत्रातील गावे व वाड्यावस्त्यांना देखील पिण्यासाठी पाणी कमी पडू लागले आहे व त्यांच्यासाठी देखील पाणी सोडण्यात यावे अशी लाखो नागरिकांची मागणी होऊ लागली आहे. याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करून उजनी धरणाच्या सर्व विसर्गस्रोतातून तातडीने पाणी सोडावे अशी लाखो नागरिकांची जास्त मागणी होत आहे.
Web Title: 5000 cusecs of water released from ujni for solapur city nrab