After Srinivas Vanaga expressed opinion about Shinde group
पालघर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण रंगले आहे. पहिल्यांदाच तीन पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवत असल्यामुळे जागावाटपामध्ये अनेक नेते नाराज झाले आहेत. महायुतीमधील अनेक नेत्यांमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. पालघरचे विद्यमान शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आले आहेत. महायुतीने तिकीट नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्याशी संपर्क तुटला होता. ते घरातून न सांगता गेल्यामुळे चर्चेत आले होते. निघून जाण्यापूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बरेच वक्तव्य केले होते. मात्र आता परत आल्यानंतर श्रीनिवास वनगा यांचा तक्रारीचा सूर मावळला आहे.
शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी परत आल्यानंतर माध्यामांशी संवाद साधला. यावेळी वनगा म्हणाले की,, मी माझ्या नातेवाईकांच्या घरी गेलो होतो. पालघर किंवा डहाणू विधानसभेसाठी मला तिकीट नक्कीच मिळेल, अशी मला अपेक्षा होती. पण तिकीट न मिळाल्यामुळे मी नाराज होतो. पण मी ठाकरे गटाशी कुठलाही संपर्क साधलेला नाही. माझे तिकीट कापण्यासाठी काही जणांनी षडयंत्र रचले. त्यांच्यावर एकनाथ शिंदेंनी कारवाई करावी, अशी माझी अपेक्षा आहे. यापुढे शिंदे सांगतील ते काम मी करेन, असे मत श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केले.
निघून जाण्यापूर्वी श्रीनिवास वनगा यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. एकनाथ शिंदे यांनी माझा घात केला असे ते म्हणाले होते. आता परत आल्यानंतर या विधानाबाबत प्रश्न विचारला असता. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंनी नाही तर त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी माझा घात केला. एकनाथ शिंदेंची दिशाभूल करण्यात आली. मी यापुढेही प्रामाणिक राहून काम करत राहील. मी शिवसेनेशी एकनिष्ठ आहे, असे मत श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केले आहे. त्यापूर्वी निघून जाण्यापूर्वी आक्रमक पवित्रा घेतलेल्या श्रीनिवास वनगा यांचा आता राग निवळलेला दिसत आहे.