
फोटो सौजन्य - Social Media
वाड्यावस्त्यांवर कुणालाही सुगावा न लागू देता चोरपालांनी अवतरणारा बिबट्या आता एआय कॅमेऱ्याची नजर चुकवू शकणार नाही. नव्याने लावण्यात आलेल्या एआय (एआय अँड एज कम्प्युटिंग बेस्ड लेपर्ड डिटेक्शन सिस्टीम विथ मोबाइल ॲप) प्रणालीच्या कॅमेऱ्यात बिबट्या दिसताच सायरन वाजतो; तसेच दिवे लागतात. सायरनच्या ध्वनीच्या आवाजाची क्षमता जेट विमानाच्या आवाजाइतकी म्हणजे १२० डेसिबल असल्याने वस्तीत ॲलर्ट कळतो. त्यामुळे बिबट्या असल्याची खात्री होऊन ग्रामस्थ तत्काळ सावध होतात. लागलीच ग्रामस्थांनाही बिबट्या आला आहे, तर सतर्क राहा, असा संदेश मिळतो. त्यानंतर त्या ठिकाणी रेस्क्यू पथक पोहोचून सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करते, अशी ही यंत्रणा आहे.
मोखाडा तालुक्यातील वेगवेगळ्या भागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची घटनादेखील घडली आहे. त्यातच वेगवगळ्या भागात संध्याकाळ आणि रात्री बिबट्याचे अनेकांना दर्शन घडले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक भेदरले आहेत. बिबट्याची माहिती नागरिकांना व्हावी, म्हणून वन विभागाने वारघडपाडा येथे एआय तंत्रज्ञानाचे सौरऊर्जैवर चालणाऱ्या कॅमेऱ्यासह सायरन बसवला आहे. तसेच वेगवेगळ्या भागात वन कर्मचाऱ्यांची गस्ती पथके निर्माण केली असून, नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.
मोखाडा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याने वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घातला आहे. संध्याकाळच्या सुमारास एका दुचाकीस्वारावर हल्लादेखील केला आहे. शेतकऱ्यांच्या बकऱ्या, वासरे आणि कुत्रे फस्त केले आहेत. बिबट्याच्या मुक्त संचाराबाबत पाच ते सहा गावांमधून वन विभागाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने गावोगावी जाऊन बिबट्यापासून कसे रक्षण करावे याबाबत नागरिकांचे प्रबोधन सुरू केले आहे. तसेच बिबट्याचा सततचा वावर असलेल्या वारघडपाड्याच्या पुढे एआय तंत्रज्ञान आधारित कॅमेरा बसवला आहे.
१०० मीटर अंतरावर लागते बिबट्याची चाहूल…
हा कॅमेरा सौरऊर्जेवर चालणारा आहे. त्याला एक सायरन जोडण्यात आला आहे. तसेच त्यावरील सर्व हालचाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर टिपल्या जात आहेत. १०० मीटरच्या अंतरावर बिबट्याची चाहूल लागताच हा कॅमेरा व सायरन कार्यरत होऊन आवाज देत नागरिकांना सतर्क करत आहेत.
वारघडपाडा येथे एआय तंत्रज्ञानाचा कॅमेरा व सायरन बसविण्यात आले आहे.कॅमेऱ्याच्या दृष्टीपथात बिबट्याचे आगमन होताच ,तसा तो आल्याचा मेसेज आमच्या भ्रमणध्वनीवर येतो.त्यानूसार वनविभागाचे कर्मचारी त्या – त्या ठिकाणी जावून ग्रामस्थांना जागरुक करणे,आदी तद् अनूषंगिक उपाययोजना करतात.त्या व्यतिरिक्त दिवसं-रात्र वन कर्मचाऱ्यांची गस्त ठेवण्यात आली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरादेखील आणला आहे, मात्र केंद्र सरकारच्या परवानगीनंतर तो लावण्यात येणार आहे. गावोगावी शाळांसह वाडीवस्तीवर कर्मचारी नागरिकांचे प्रबोधन करत आहेत.प्रस्तुत यंत्रणा ही चलत ( मुव्हेबल ) असल्याने आवश्यकतेनुसार कोणत्याही संवेदनशील ठिकाणी हलविता येते.